Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु त्याआधीच तीन दिवसापूर्वी जवळपास 80 हून अधिक शाळांमध्ये सोलापुरात शाळेची घंटा वाजली. कौतुकास्पद बाब म्हणजे सोलापुरामध्येच एका शिक्षिकेने ऑनलाइन- ऑफलाइन चा समन्वय साधत पहिलीचे वर्ग भरवले आणि त्यांना शिकविण्यास सुरुवात केली.

BIG9न्यूजने या कौतुकास्पद उपक्रमाची माहिती प्रयोगशील  ‘टीचर’ कडून जाणून घेतली…

माळशिरस तालुक्यातील पिरळे वस्तीशाळेत हा उपक्रम राबविण्यात येतोय.कोरोना काळात सुद्धा मागील वर्षी याच पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.येथे ऑनलाईन-ऑफलाईन समन्वय साधत १लीचे वर्ग सुरु केल्याची माहिती वर्गशिक्षिका सुप्रिया शिवगुंडे यांनी दिली.

या अभिनव उपक्रमाची माहिती देताना उपक्रमशील शिक्षिका शिवगुंडे म्हणाल्या की..

शिंदेवस्ती शाळेत मागील वर्षीच 100% अँड्रॉइड मोबाइल केल्यामुळे 2020-21 मध्ये ऑनलाईन शिक्षणात सातत्य राहिले. मागील वर्षी १ल्या इयत्तेचे झाडाखाली वर्ग भरविले पण हवे त्याप्रमाणात तयारी घेता आली नाही. कारण पाहिलीच्या मुलांचे शिक्षणात सातत्य असेल तरच उत्कृष्ट शिकतात. मध्ये खंड पडला तर पाठीमागे शिकविलेले विसरतात. मागील वर्षीचा पहिलाच अनुभव असल्यामुळे अशाच चुका झाल्या. 8-15 दिवसानंतर मुलांचा संपर्क व्हायचा. झालेल्या त्रुटी लक्षात घेत यावर्षी 15 जुनापासूनच त्यावर पर्याय काढून 50% उपस्थिती दिवशी विद्यार्थी पालकांसमवेत प्रत्यक्ष शाळेत बोलावून शिकविले जात आहे. प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करून पुढील भेटीपर्यंत काय घ्यायचे हे वहीत दिनांक टाकून लिहून देत आहे. सातत्य राहावे म्हणून दररोज एकच विषयाचा अभ्यास युट्युब व्हिडीओद्वारे ग्रुपवर देत आहे. मनोरंजकता आणण्यासाठी पाठयपुस्तकातील अभ्यासासोबत त्यास अनुरूप चित्र, पेपर क्राफ्टिंग शिकविले जात आहे. वेगवेगळे उपक्रम आणि नावीन्यता यामुळे १लीच्या पालकांतही उत्साह दिसत आहे. महिन्याच्या अखेर मासिक नियोजनही बनवत आहे.

१) उपक्रम १- ‘आनंदाचे झाड…’


दरवर्षी पहिलीचा वर्ग म्हटला की काही मुले रडारडी करतात, शिक्षकांच्या भीतीमुळे गोंधळ घालतात. यावर्षीही काही मुले आपलं नाव शाळेत घातले म्हणूनच रडू लागली. मी खूप मारते असं सांगत आक्रोश सुरु. नियमित शाळेत गाणी, गोष्टी, गप्पा यात गुंतवून ही मुले रांकेला लागतात. पण यावर्षी मात्र परिस्थिती नियमित शाळेची नाही, हे जाणून मी माझ्या वर्गात एक झाड तयार केलं. ज्याला नाव दिलं, ‘आनंदाचं झाड’. दररोज मुलांना नियमित अभ्यासासोबत सोपे चित्र , क्राफ्टिंगचे व्हिडीओ पाठवत आहे. मुलांनी ते बनवून मी असेन त्या दिवशी शाळेत येऊन आपले क्राफ्ट, चित्र या झाडावर चिकटवायचे आहे, असं सांगितलं. गेली महिनाभर १लीची मुले उत्साहात कृती करून झाडावर चिकटवत आहेत. आमचं हे आनंदाचं झाड आता फळा, फुलांनी, प्राण्याच्या चित्र-क्राफ्टिंग ने भरलं आहे, बहरलं आहे. इतर वर्गातील मुलेही उत्साहात सहभागी होतं आहेत.

२) उपक्रम २- ‘Selfie With- माझे मित्र…’

पहिल्या इयत्तेच्या पाठयपुस्तकात माझे मित्र चित्रवाचन आहे. हा घटक ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चर्चात्मक शिकवून झाल्यावर मी मुलांना त्यांच्या घरात पाळलेले प्राणी, पक्षी यांची माहिती घेतली. ते सर्वजण आपले मित्र असून त्यांच्यासोबत सेल्फी पाठविण्यास सांगितले. १ली सोबत वरच्या वर्गातीलही मुलांनी आपल्या घरातील बदक, वासरू, कुत्रा, मांजर, शेळी यांच्यासोबत सेल्फी पाठविले.. मुलासोबत पालकांतही वेगळाच आनंद दिसत आहे.

३) उपक्रम ३- ‘संडे फन डे…’


रविवारचा दिवस सुटीचा, आनंदाचा, मजेचा…🥰 या दिवशी फक्त्त मज्जा, धम्माल करायची म्हणून चित्रकला आणि कार्यानुभव या विषयावर आधारित सोप्पे काम देत आहे.. टोमॅटो, मासा, मास्क, चिमणी असे चित्र, क्राफ्ट व्हिडीओतून शिकवत आहे, मुले पालकांच्या मदतीने चित्र, क्राफ्ट बनवून आकर्षक कलाकृती सादर करतात..

उपक्रम ४- ‘झाडे माझे मित्र…’


मुले घरीच आहेत हे जाणून त्यांना झाडांविषयी प्रेम, आपुलकी वाढावी म्हणून व्हिडीओ, व्हाट्सअँप वरच मार्गदर्शन केल असता जुन्या वस्तूंचा वापर करून १लीने वृक्षारोपण करून विशेष उत्साह दाखविला.. तसेच योगदिनी मुलांनी घरीच सोप्पी योगासने करून, निबंध लिहून पाठवले.

उपक्रम ५- ‘Connecting Classrooms Together…’


शाळा सुरु होण्यापूर्वीच माझी आणि बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक प्रेमचंद राठोड सर यांच्याशी चर्चा झाली.. आमच्याकडे सारखेच वर्ग असल्यामुळे आम्ही मिळून काम करायचे ठरविले. सरांनी 1500हून अधिक टेस्ट helloguruji.com वर आणि मी 1600 हुन अधिक व्हिडीओ बनविले आहेत. आम्ही व्हाट्सअप, टेलिग्राम ग्रुपवर 5000 हुन अधिक शिक्षक-विद्यार्थी यांचे ग्रुप बनवून दररोज एकच विषय आणि एकच घटकावर आधारित व्हिडीओ व टेस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवीत आहोत.. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी टेस्ट सोडविल्याचे स्क्रिनशॉट, व्हिडीओ पाहून केलेला अभ्यास, आकर्षक चित्रे, क्राफ्ट पाठवितात. फोन करून पालक सांगतात, आमच्या शाळा सुरु नाहीत, पण तुमच्यामुळे मुले नियमित अभ्यासात गुंतली आहेत… मुलेही voice रेकॉर्डिंग, मेसेजेस करून छान छान संदेश पाठवितात. यासाठी कष्ट भरपूर करावे लागतात, पण आनंद आहे की शिंदेवस्तीपुरते मर्यादित न राहता राज्यातील इतर शाळातही पोहोचतो आहे..

खरं पाहता शिक्षण ते शिक्षणच आहे. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. ऑनलाईनने माझ्या पाल्याच नुकसान झालं अशी फक्त्त मानसिकता आहे. नियमित शाळेतही शिक्षक जे काही शिकवितात, ते सर्वच विद्यार्थी 100% ग्रहण करतातंच असं नाही. काही मुले 90%, काही 100%, कुणी 50%, कुणी 30-40% ग्रहण करत असतो. ऑनलाईन शिक्षणातदेखील असंच दिसत आहे. मागील वर्षांपासून मी ऑनलाईन क्लास घेतले, पण मला असं जाणवलं की ‘अ’ श्रेणीचा विदयार्थी ऑफलाईनप्रमाणेच ऑनलाईनमध्येही त्याच क्षमतेने ग्रहण करतो आहे.. ‘ब’ श्रेणीचा विद्यार्थी त्याच्याच कुवतीप्रमाणे शिकत आहे. प्रत्येकजण त्याच क्षमतेने शिक्षण घेत आहे. तरी पालकांनी आपलं नुकसानच होईल अशा गैरसमजुतीत न राहता आपल्या पाल्याला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.. आमच्या शिंदेवस्तीत अडाणी पालक नाहीत. कुणी 10वी, 12वी, पदवी ग्रहण केलेले असे पालक आहेत. जर सर्व पालकांनी शिक्षक सांगतात, त्या मार्गाने गेल्यास अधोगती नाही तर नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील, यातून प्रगती तर निश्चित होणारच.. मानवी मन असं आहे, की ते जसा विचार करते तसे घडविते. त्यामुळे फक्त गरज आहे, ती मानसिकता बदलण्याची..! आहे ही परिस्थिती स्वीकारण्याची..!

सुप्रिया शिवगुंडे

सुप्रिया शिवगुंडे, शिक्षिका
जिल्हा परिषद शाळा, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *