Big9 News
श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टचा उपक्रम : सोलापूरात प्रथमच
श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे सद्गुरू श्रो. ब्र. श्री. ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या संकल्पनेतून १७ ते १९ मार्च दरम्यान विश्वशांतीसाठी श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन उत्सव व मठाचे लोगो अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री श्री सद्गुरु बसवारूढ महास्वामीजी मठाचे मठाधिपती सद्गुरु श्रो. ब्र. श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. मठ यंदा ५० व्या वर्षांत पदार्पण करत असल्यानिमित्त विमानतळाच्यामागील श्री बसवारूढ मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एक हजारहून अधिक महिलांच्या हस्ते श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम सोलापूरात प्रथमच होत आहे. मुंबईच्या संन्यास आश्रमाचे प. पू. आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण उत्सव करण्यात येणार आहे.
कुंकूमार्चन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना मठाचे संस्थापक सद्गुरु श्रो. ब्र. श्री ईश्वरानंद महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले श्रीयंत्र देण्यात येणार आहे.
शुक्रवार, १७ मार्च रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कुंकुमार्चन व त्यानंतर आरती महाप्रसाद होणार आहे. शनिवार, १८मार्च रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत कुंकूमार्चन, १ हजार महिलांची ओटी भरण्याचा कार्यक्रम तसेच हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. यावेळी ऋतुजा कुलकर्णी यांचा कथकनृत्य कार्यक्रम व महाप्रसाद होईल. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रविवार, १९ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री महालक्ष्मी हवन होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत धर्मसभा आणि मठाचा लोगो अनावरण कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते एक वाजेपर्यंत हवन पूर्णाहुती व श्रीयंत्र वाटप महाप्रसाद हे कार्यक्रम होणार आहेत.
श्रीयंत्र कोटी कुंकूमार्चन उत्सवात कुंकुमार्चनासाठी अधिकाधिक महिला भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मठाधिपती सद्गुरु श्रो. ब्र. श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९०२१५२९९७० किंवा ९१४६४८०७३८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, संजय हिरेहब्बू, माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी महापौर नलिनी चंदेले, श्रीशैल बनशेट्टी, महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धाराम खजूरगी उपस्थित होते.
१५०० श्रीयंत्र अन् तब्बल २ क्विंटल कुंकू
श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन उत्सवासाठी १५०० श्री यंत्र मागवण्यात आले असून करमाळ्यातील केम येथून तब्बल २ क्विंटल कुंकू घेण्यात आले आहे. श्रीयंत्र कोटी कुंकुमार्चन कार्यक्रमात एक हजारहून अधिक महिला सहभागी होणार आहेत.