राज्यात कठोर निर्बंधाशिवाय पर्याय नाही : शरद पवार

मुंबई,दि.8 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानंतर राज्यातील व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना परिस्थिती अत्यंत भीषण असून हा कसोटीचा काळ आहे, या काळाला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी म्हटले.

राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील वैद्यकीय स्टाफ अहोरात्र झटक असून परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत, याचा दुसरा पर्याय नाही. केंद्र सरकारचाही हाच सूर आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. मी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी, केंद्र सरकार संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला.

कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परिस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पवार यांनी म्हटलं.