Big 9 News Network
आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा सीईओ स्वामी यांनी घेतला. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी व मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी गेले वर्षभर कोविडच्या या अवघड परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्तम प्रकारे काम करीत असल्याबद्दल सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
बैठकीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. इरफान सय्यद, प्रशासन अधिकारी ए.ए. सय्यद, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.दळवी, जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात उपस्थित होते.
पुढे बोलताना क्षेत्रीय कर्मचारी जर जीव धोक्यात घालून फिल्डवर काम करत असतील तर त्यांची कामे कार्यालयात बसून वेळेवर करणे हे आपले कर्तव्य आहे अशा कानपिचक्या मुख्यालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वामी यांनी दिल्या.
कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती इतर सेवाविषयक लाभ तातडीने कर्मचाऱ्यांना देण्या संदर्भात कामकाज लवकरात लवकर पूर्ण करावे. प्रलंबित वैद्यकीय देयके तात्काळ निकाली काढावीत, येथून पुढे वैद्यकीय देयके आपल्या टेबलवर पंधरा दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बालमृत्यूच्या कारणांचे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करून अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत माझ्याकडे सादर करावा. कर्मचारी स्वतः नीटनेटके राहतात मग ते हाताळत असलेली फाईल सुद्धा नेटकीच हवी अशी अपेक्षा स्वामी यांनी कर्मचाऱ्यांकडे व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा लसीकरण अधिकारी हे कोविडच्या कामात प्रचंड व्यस्त असल्याने कार्यालयातील प्रशासकीय बाबींकडे संपूर्ण लक्ष देण्याच्या सूचना प्रशासन अधिकारी सय्यद यांना परमेश्वर राऊत यांनी दिल्या. चालू आर्थिक वर्षात खर्चाचे नियोजन आत्तापासूनच करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या, कोणत्याही परिस्थितीत निधी परत जाणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक विषयाशी निगडीत कोणतीही अडचण असल्यास माझ्याशी चर्चा करा असे आवाहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तपासणी मध्ये लिपिकांकडून कामे व्यवस्थित व तात्काळ केले नसल्याबाबत आढळून आले आहे तरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व संबंधित लिपीकांनी आपली कामे व्यवस्थित करावीत कोणतीही अनियमितता होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून कोणतेही वाद न करता चांगले काम करावे व आरोग्य विभागातील वातावरण हेल्दी ठेवावे असे आवाहन बैठकीचे समारोपावेळी स्वामी यांनी केले.
Leave a Reply