- जिल्ह्यातील १५० केंद्रांवर आज एकाच दिवशी २ लाख लसींचे डोस देण्याची व्यवस्था
- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
- जिल्ह्यातील १६ लाख १४ हजार लोकांनी घेतली कोरोना लस
सोलापूर, दि.१०: सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोनामुक्त करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जलदगतीने अधिकाधिक लस मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरसाठी अधिक लसींची उपलब्धता करून घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसींची डोस मिळाले आहेत. शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
लसीकरणासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागाला नेटके नियोजन करून दिले आहे.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती. लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आजवर जिल्ह्यातील १६ लाख १४ हजार २० लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आजवर ५५ वेळा कोविशिल्डची लस १४ लाख २२ हजार ८४० तर २८ वेळा कोव्हॅक्सीनची ८२ हजार ६४० इतके डोस आले. यातून ८ ऑगस्टपर्यंत ११ लाख ७४ हजार ३१० जणांना पहिला तर ४ लाख ३९ हजार ७२० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण लसीकरण १६ लाख १४ हजार ३० इतके झाले आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून एकाच दिवशी ७७ हजार ८४० इतके विक्रमी लसीकरण एकाच दिवसात झाले आहे. एका केंद्रावर जवळपास ८०० ते १२०० डोस देण्यात आले आहेत. यात ग्रामीणमध्ये ६५ हजार ७२१ तर ग्रामीण भागात १२०४९ इतके लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यात लसीकरणात टॉप असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी न थकता काम केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.
जुलै २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी लसीचा कमी साठा मिळत होता. तो वाढवून द्याव्या. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मी, जिल्हाधिकारी श्री शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री स्वामी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आरोग्य विभागाकडे डोस वाढवून देण्याबाबत सातत्याने मागणी केली होती, यामुळे जिल्ह्याला जादा लस मिळत आहे.
*सोलापूरची तुलना पुण्याशी नकोच*
सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हा मोठा आहे. सिरम इन्स्टिट्यूटसह विविध सामाजिक संस्था व संघटना पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींची उपलब्धता करून देत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण होत आहे. आज राज्यामध्ये सर्वाधिक लसींचे डोस सोलापूर जिल्ह्याला मिळत आहेत. लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सतत संवाद साधून सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक लसीचे डोस उपलब्ध करून देण्याबाबत माझा पाठपुरावा सुरूच आहे. पुणे जिल्हा मोठा असल्याने त्या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांकडून सर्वाधिक लसी पुरवल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी अधिक लसीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्याबाबतीत सोलापूरची तुलना पुण्याशी करणे योग्य नाही. आगामी काळात निश्चितपणे लसीकरणात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर नक्कीच येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात आधी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आहे. सोलापूर जिल्हावासियांनी शासनाने सूचित केलेल्या नियमांचे पालन करून स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घ्यावी. गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.