सोलापूर,दि.5 : कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमावली जाहीर केली होती. संध्याकाळी ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर शुक्रवारी संध्याकाळी ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश काढले आहेत. नवीन आदेशानुसार सोलापूर शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून सर्व दुकाने मॉल बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
सोलापूर शहरात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल स्टोअर हे सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हाॅटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत रूग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा दुकानं बंद राहणार आहेत.