तंबाखूमुक्त शाळा विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र शासन व सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याला साथ देण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्तीचेही संस्कार देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ऑनलाईन कार्यशाळेत सलाम मुंबई फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हा समन्वयक शुभांगी लाड यांनी केले.
त्या माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांना “तंबाखूमुक्त शाळा व आरोग्यसंपन्न मुले” या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी केले.
पुढे बोलताना शुभांगी लाड म्हणाल्या की, सध्या माढा तालुक्यातील मान्यताप्राप्त 450 शाळांपैकी 64 शाळांनी नोंदणी केली आहे असून श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय कापसेवाडी-हटकरवाडी या एकमेव माध्यमिक विद्यालयासह 4 प्राथमिक शाळा अशा एकूण 5 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून नोंदणीकृत 29 शाळांचे निकष अपूर्ण आहेत तर 386 शाळांनी अद्यापही ऍप वरती नोंदणी सुद्धा केली नाही त्यामुळे या सर्व माध्यमांच्या शाळेतील शाखाप्रमुखांनी लवकरात लवकर सर्व 11 निकषांची पुर्तता करून पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी विस्ताराधिकारी बंडू शिंदे म्हणाले की,सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा तंबाखूमूक्त करण्यासाठी मोठी चळवळ उभी केली आहे त्याला सर्वांनी सहकार्य केले तर भविष्यात कर्करोगाने मृत्यू होणा-यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती आत्मसात करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेस सोलापूर येथील सारथी युथ फाऊंडेशनचे रामचंद्र वाघमारे,केंद्रप्रमुख डॉ.विलास काळे, मुख्याध्यापक विजय काळे,औदुंबर गायकवाड,अनिल कदम,लहू लोंढे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,अनिल काळे,पांडुरंग शिंदे,श्रीकांत काशीद, सुहास चवरे,मोहन चव्हाण,मकरंद रिकिबे,गणपत दाढे,छाया राऊत, राजाभाऊ कदम,शहाजी क्षीरसागर, प्रतिभा बोराडे, शुभांगी गवळी,शुभांगी कदम, विठोबा गाडेकर,सोमनाथ खरात,दिनेश गुंड,शब्बीर तांबोळी,अंकुश घोडके,केशव गायकवाड,सचिन पवार,उत्कर्ष भडकवाड,महेश वेळापुरे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.