Big9news Network
कॉग्रेसमध्ये एकाधिकारशाही करणाऱ्या आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षाच्या वरिष्ठांनी तसेच शिस्तपालन समितीने समज द्यावी अशी मागणी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या 40 वर्षापासून सोलापूर कॉग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सावली बनून कॉग्रेस पक्ष बळकट करण्याचे काम करणारे सुधीर खरटमल यांचा अपमान केल्याने त्यांनी कॉग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही आजी माजी कॉग्रेसचे पदाधिकारीही कॉग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जात आहेत. केवळ आमदार प्रणिती शिंदे यांच्या चुकीच्या वागण्यामुळे हे घडत आहे. आ. प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूर कॉग्रेसला घरघर लागलेली आहे.
माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, सुधीर खरटमल यांच्यासह अनेक नेत्यांनी सोलापूरमध्ये कॉग्रेस वाढवली, कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली अनेकांना सत्तेत सामावून घेतले असे असताना आ. प्रणिती शिंदे यांनी मात्र ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करणे दूरच परंतु त्यांचा अपमान करणे, त्यांना कार्यक्रमाला न बोलावणे, हट्टीपणाने निर्णय घेवून इतरांना दुखावणे असे प्रकार करीत आहेत त्यामुळे कॉग्रेस मधील अनेकजण त्यांच्या या कार्यपध्दतीवर प्रचंड नाराज झालेले आहेत. सुधीर खरटमल यांनी सुशीलकुमार शिंदे यांची उणीव कधीच कार्यकर्त्यांना भासू दिली नाही. प्रणिती शिंदे यांना आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा सुधीर खरटमल यांचाच आहे. तरीही सुधीर खरटमल यांनी अनेकदा आ. प्रणिती शिंदे यांनी केलेला अपमान सहन करीत कॉग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करीत राहीले. सुधीर खरटमल आणि माजी राज्यपाल डि वाय पाटील यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा 75 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये आयोजित करून न भुतो न भविष्यती असा साजरा केला. त्याची जाणीवही न ठेवता केवळ अपमान करणे हाच धर्म असल्यासारखे आ. प्रणिती शिंदे वागत आहेत. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनीही प्रणिती शिंदे यांच्या विरूध्द शिंदेसाहेबांकडे तक्रार केली होती त्यांना तर शिंदे यांनी प्रदेश अध्यक्षांकडे तक्रार करा असे सांगितले यावरून आ. प्रणिती शिंदे या आपल्या वडीलांचेही एैकत नाहीत असे समजले.
त्यांच्यामुळे कॉग्रेस पक्षातील अनेकजण नाराज झालेले आहेत आगामी महानगर पालिका निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे भवितव्य काय याबाबत अध्यक्ष प्रकाश वाले यांना निवेदन देण्यात आले परंतु त्यांनीही त्यावर काहीच कार्यवाही केली नाही म्हणून कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच शिस्तपालन समितीकडे आ. प्रणिती शिंदे यांना समज देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले असल्याचेही यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला सुर्यकांत शेरखाने, जितेंद्र चव्हाण, प्रविण वाडे, जाविद अहमद शिकलकर, सोपान थोरात यांच्यासह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply