‘शिक्षण गाथा`महापालिकेच्या ‘शाळे’ची ; आज शाळेचा पहिला दिवस..

BIG 9 NEWS NETWORK

महापालिका शिक्षण विभागाचे कार्य उत्कृष्ट – `महापौर सौ. श्रीकांचना यन्नम

सोलापूर: कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या कालावधीतही मागील वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्य केले आहे. कोविडसारख्या महामारीच्या कालावधीतही शहरातील सर्व शिक्षकांनी कोविड कर्तव्य बजावूनही विविध प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहात टिकून राहण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचे शिक्षण गाथामधून प्रतिबिंबीत होते. अशाच प्रकारचे अनेक उपक्रम राबविण्यासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देते असे प्रतिपादन महापौर सौ. श्रीकांचना यन्नम यांनी केले.

आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शहरातील एक विद्यार्थी, एक विद्यार्थीनी यांचे गुलाब पुष्प देऊन प्रातिनिधिक स्वरुपात स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित शिक्षकांनाही गुलाब पुष्प देऊन नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमात शिक्षण विभागाने गेल्या वर्षभरात केलेले कामकाज `शिक्षण गाथा` या स्मरणिकेचे रुपाने संकलित केले आहे. त्याचे प्रकाशन महापौर सौ. श्रीकांचना यन्नम यांचे हस्ते झाले.

या शिक्षण गाथामध्ये 21 मार्च 2020 पासून गुरुमंत्र, कोविडविषयी जनजागृती प्रश्नावली, गुरु शिष्याच्या दारी, स्वाध्याय संच निर्मिती व वितरण, दिव्यांगासाठी ब्रेल लिपीतून स्वाध्याय निर्मिती व वितरण, ऑनलाईन शिक्षणासाठीचे विविध प्रयत्न अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांचा सचित्र समावेश केला आहे. तसेच याबाबत पालकांच्या प्रतिक्रियाही समाविष्ट केल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये महापालिका शाळांमध्ये प्रत्येक दिवसनिहाय ऑनलाईन शिक्षण नियोजन पत्रिकेचही प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच पुढील वर्षभरात विद्यार्थ्यांना द्यावयाच्या स्वाध्याय संच संकलन पुस्तिकेचेही यावेळी महापौर यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.

संपूर्ण राज्याला पथदर्शी ठरेल असे काम शिक्षण विभागाने गेल्या वर्षभरात केले आहे असे सांगून शिक्षण विभागाच्या कामकाजाचे उपायुक्त श्री. धनराज पांडे यांनी यावेळी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रशासनाअधिकारी श्री. कादर शेख यांनी केले. यावेळी नगरसेवक श्री. बाबा मिस्त्री, कार्यालयीन पर्यवेक्षक श्री. बुलबुले, श्रीमती शेख इ. उपस्थित होते.