Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

सोलापुरातील एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यांनी सुरवातीला शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवला, आता ग्रामीण भागातील गुन्हेगारांवर आपली जरब बसवली आहे. श्री.शैलेश खेडकर असे या अधिकाऱ्याचे नाव असून तपास कामात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी केले आहे.

लालचीपणा आणि त्याच्यातून होणारी ऑनलाईन फसवणूक याबाबत सविस्तर जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात..

मा. पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून फेसबुक अकाऊंटवर दिसणा-या ओळखीच्या लोकांना पैशाची मागणी केल्यामुळे अज्ञात आरोपी विरूध्द दाखल गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने व स्वस्तात कार देतो म्हणून OLX चा वापर करून झालेल्या ऑनलाईन फसवणूकीच्या गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने नुकताच राजस्थान येथे जावून आलो. राजस्थान येथील भरतपूर जिल्हयात ऑनलाईन ठगवणूक करणारे अनेक आरोपी आहेत, काही अपवाद वगळता गांवच्या गांवे ऑनलाईन ठगवणूक करण्यात माहिर आहेत.

झारखंड राज्यातील जामतारा जिल्हयातील करमातारा गांवाप्रमाणेच राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्हयात ठगवणूक करणारी अशी गांवे आहेत. त्यात गाॅंवडी गांव सध्या याबाबतीत सर्वात अग्रेसर आहे. गाॅंवडी गांवाप्रमाणेच भरतपूर जिल्हयातील मुख्यतः सीकरी पोलीस ठाणे, जुरहरा पोलीस ठाणे हद्दीतील ब-याचशा गांवामध्ये ऑनलाईन ठगवणूक करणा-या आरोपींची संख्या मोठया प्रमाणात आहे. गाॅंवडी गांवात आरोपीच्या शोधकामी गेलो असता, सदरचे गाॅंव एक खेडेगांव असले तरी तेथे घनदाट लोकवस्ती आहे. एका छोटयाशा घरामध्येही दहा ते पंधरा लोक तेथे दाटीवाटीने राहतात. या गांवात नेमलेल्या गोपनीय बातमीदाराने या लोकांच्या सर्वच गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती दिली. सुरूवातीस हे लोक सोन्याचे बनावट विटा, सोन्याचे बनावट नाणी,( पितळी नाणी / विटा सोन्याची आहेत म्हणून विकणे ) अशा प्रकारचे गुन्हे करत. त्यानंतर ऑनलाईन फसवणूकीमध्ये हे आरोपी आले. ऑनलाईन फसवणूक करताना, खूप दूरवरच्या लोकांना फसविता येते, गांव सोडावे लागत नाही, म्हणून पोलीस पकडण्याची शक्यता फार कमी होते. म्हणून हे लोक ऑनलाईन फसवणूकीकडे वळाले. त्यामध्ये OLX वर जून्या कार/ वस्तू विकणे, फेसबूक फेक अकाऊंट तयार करून अकाऊंट वरील ओळखीच्या लोकांना पैशाची मागणी करणे, फेसबुक वरून सेक्सटोर्शन करणे अशा प्रकारचे फसवणूकीचे नविन नविन प्रकार आरोपींनी शोधले. तेथील एका माहितगाराने असे सांगितले की, ‘‘एक कहावत है साहब, किसीभी घरमें ऐसा बच्चा नही, की जो ऑनलाईन ठगवणूक नही करता । कम पढे लिखे बच्चे / बुढे आदमी भी ठगवणूक करते है । ऐसे बहोत सारे गांव भरतपूर जिल्हे में है । ’’

तेथील तपासामध्ये फसवणूकीचे समजलेली उदाहरणे:-

1) सोन्याच्या बनावट विटा / शिक्के विकणे – गाॅंवडी गांवातील एका इसमाने तालुक्याच्या ठिकाणच्या एका डाॅक्टरांना माझेकडे पैसे नाहीत म्हणून तपासणी व उपचार फी साठी सोन्याचे नाणी दिली तर चालतील का? असे विचारले, असता डाॅक्टरांनी होकार दिल्यावर झालेल्या बिलाच्या किंमती ऐवढी नाणी त्या पेशन्टच्या नातेवाईकाने त्यांना दिली. सदरची नाणी तपासल्यावर ती खरी असल्याचे डाॅक्टरांना समजले, अशा प्रकारे त्यांनी डाॅक्टरांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर डाॅक्टरांनी त्यांना विश्वासाने, ती नाणी कोठून आणली? असे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने घराचे बांधकाम करत असताना पाया खोदताना ती नाणी सापडले, असल्याचे सांगितले व त्यांचेकडे अशी भरपूर नाणी असल्याचे सांगून ती कमी किंमतीत विकायची असल्याचे सांगितले. डाॅक्टरांना अगोदरच विश्वास पटल्याने त्यांनी एक किलो सोन्याची नाणे घेण्याचा व्यवहार केला असता यात आरोपींनी त्यांना एक किलो सोन्याची पाणी ढाळलेले पितळी नाणी देवून त्यांचेकडील पैसे काढून घेवून त्यांची फसवणूक केली. अशाच प्रकारे बांधकाम करताना पाया खोदताना सोन्याच्या विटा सापडल्या म्हणून व्यवहार केल्याची उदाहरणे तेथे ऐकायला मिळाली.

2) सेक्सटाॅरशन:- एका इंजिनियर व्यक्तीने अनोळखी मुलीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने ती एक्सेप्ट केली. काही दिवस त्यांच्यात चॅटींग सुरू होते. त्यानंतर मैत्री झाली व त्यांनी एकमेकांचा व्हाॅट्सऍप मोबाईल नंबर शेअर केला, काही दिवस चॅटींग झाल्यानंतर त्याच मुलीचा पाॅर्न व्हिडिओ आरोपी यांनी प्ले करून, ती मुलगी लाईव्ह असल्याचे भासविले व इंजिनियर यांना पूर्ण कपडे काढून हस्तमैथून करायला भाग पाडले. त्याचा स्क्रिन रेकाॅर्डरव्दारे व्हिडीओ बनवून तो त्यांना पुन्हाः व्हाॅट्सऍपवर पाठवून, ब्लॅकमेलींग करण्यास सुरूवात केली. सुरूवातीस हा व्हिडिओ यु टयुब, फेसबुक व इतर सोसिएल मिडीयावर व्हायरल करतो, म्हणून पैसे उकळले. त्यानंतर इंजिनियर यांनी पैसे देणे बंद केल्यावर त्यांना दुस-या नंबर वरून काॅल करून तुम्ही चॅटींग केलेल्या मुलीने काल रोजी आत्महत्या केली असून मी त्या मुलीचा नातेवाईक म्हणून तक्रार देण्यास पोलीस ठाणे येथे चॅटींगचे सर्व पुरावे घेवून चाललो आहे, असे खोटे सांगितले. इंजिनियर यांनी त्या व्यक्तीने तक्रार करू नये, म्हणून भितीच्या छायेखाली आरोपींना 27 लाख रूपये ऑनलाईन पाठविले. इंजिनियर यांची फसवणूक झाली असल्याचे त्यांचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात तक्रार दिली.

3) कमी किंमतीत OLX वर कार / वाहन विकणे – कितेक लोकांना या आरोपींनी कमी किंमतीत OLX वर गाडी देतो म्हणून टॅक्स भरणे, आरटीओ फि भरणे, गाडी पोच करण्याचे भाडे याचे पैसे भरावयास सांगून वेळोPवेळी त्यांचेकडून पैसे काढून घेवून त्यांची फसवणूक केली आहे.

4) KBC लॉटरी – कित्येक लोकांना लॉटरी लागली म्हणून खोटे मेसेज पाठवून त्यांचेकडून जलॉटरी मधून मिळणा-या पैशाचा टॅक्स भरावा लागेल म्हणून लाखो रूपये उकळलेले आहेत.

5) Fake facebook अकाऊंट तयार करून पैषाची मागणी करणे – एखादया व्यक्तीचे फेक फेसबुक अकाऊंन्ट तयार करून त्यांचे फ्रेंड लिस्ट मधील ओळखीचे लोकांना पैशाची गरज आहे, असे सांगून पैशाची मागणी करून लोकांकडून फोन पे / गुगल पे व्दारे पैसे घेवून त्यांची फसवणूक केली आहे.

अशी फसवणूक करणारे आरोपींचे शिक्षण पाहता काहीजण 4 थी, 7 वी तर काहीजण 9 वी शिकलेले आहेत. यातील जवळजवळ 95 टक्के आरोपी यांचेे 10 वी च्या आत शिक्षण झालेले आहे. एवढे कमी शिकलेले आरोपी शिकलेल्या लोकांना कसे फसवितात ? असा प्रश्न आपल्याला पडतो. परंतु, या सर्व गोष्टींचा सारासार अभ्यास करता, याचे एकच उत्तर मिळते, ते म्हणजे फसवणूक झालेल्या लोकांमध्ये असलेले ‘‘लालच’’.

लाॅटरी लागली व त्याचे पैसे आपल्याला भेटणार आहेत म्हणून टॅक्स च्या नांवाखाली पैसे भरणारे, OLX वर कमी किंमतीत कार भेटते म्हणून पैसे भरणारे, कमी किंमतीत सोन्याचे शिक्के भेटतात म्हणून पितळी शिक्के घेणारे, अनोळखी मुलीसोबत चॅट करण्यास मिळते म्हणून वाईट सवयी असणारे लालची लोक, या सर्वांचा या मध्ये समावेश होतो. अशा लालचामुळेच ते स्वतःची फसवणूक करून घेतात. लालच बाजूला ठेवले तर होणारी फसवणूक आपण टाळू शकतो.

राजस्थान मधील भरतपूर जिल्हयात एवढया मोठया प्रमाणात आरोपी आहेत की, ते फक्त ठगवणूक करण्याचेच काम करतात. आपले महाराष्ट्र पोलीस प्रत्येक वेळी आरोपी आणण्यासाठी एवढया दूर गेले तरी आरोपी तेथे मिळून येतीलच असे नाही. कालच मी वर्तमान पत्रामध्ये एक बातमी वाचली की, एका आमदार साहेबांना अश्लील व्हिडिओ काॅल करून ब्लॅकमेल केले, परंतु यात त्यांची काहीच चूक नव्हती. त्यांनी त्याबाबत लगेच तक्रार ही दाखल केली. परंतु बरेचजण असे आहेत की, जे सेक्सचॅटला रिप्लाय देतात व आपली इज्जत जाईल म्हणून तक्रार ही करीत नाहीत. परंतु फसवणूक झाली असल्यास पोलीसांकडे तक्रार करण्यास घाबरू नका. अशा फसवणूकीपासून वाचायचे असेल तर लालच बाजूला ठेवा. कोणीही तुम्हाला कमी किंमतीत व फुकट काहीही देत नाही आणि जर देत असतील तर त्यामध्ये फसवणूक होणार, हे ठरलेलेच आहे.

कोणाला लाॅटरी लागली आहे म्हणून काॅल / मेसेज आला तर त्याला रिप्लाय देवू नका. सर्वांनी आपले फेसबुक अकाऊंट प्रोफाईल लाॅक करा. अनोळखी मुली / मुले / व्यक्ती यांच्या फ्रेन्ड रिक्वेस्ट, चॅटला प्रतिसाद देवू नका. फेसबूक प्रायव्हसी टॅबचा वापर करा. कोणी फेसबुक वरून पैसे मागितले तर त्या व्यक्तीला फोन करून त्याबाबत खात्री करा. अनोळखी लिंक कधीही ओपन करू नका. लक्षात ठेवा सतर्क राहिलात तरच तुम्ही तुमची फसवणूक तुम्ही टाळू शकता.

शैलेश खेडकर,
पोलीस उपनिरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *