Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर ओढवणाऱ्या म्युकरमायकोसिस रूग्णांबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

            नियोजन भवन  येथे कोरोना रुग्णांच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,  वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही असल्याने यंत्रणेने आवश्यक काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी करावी. त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करा. जिल्ह्यात 173 म्युकरमायकोसिसचे रूग्ण उपचार घेत असून त्यांना लागणारी औषधे, इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत. म्युकरमायकोसिस रूग्णांचा मृत्यू होणार नाही, याबाबतही दक्षता घ्याव्यात.

            जिल्ह्यात सध्या 2696 कोरोनाचे रूग्ण उपचार घेत असून त्यांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून द्या. कोरोना रूग्णांचा पॉजिटीव्हीटी दर 3.51 टक्के कमी होत असला तर मृत्यूदर वाढणार नाही, याची दक्षता घ्या. पंढरपूर, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात यंत्रणेने दक्ष राहून काम करावे. या तालुक्यातील पॉजिटीव्हिटी दर कमी करण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या.

            संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत मुलांना संभाव्य धोका ओळखून तयारी करा. रॅपिड ॲन्टिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट वाढवून रूग्णसंख्या शून्यावर आणून जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            जिल्ह्यात 89 हजार 849 बालकांची तपासणी करण्यात आली असून 1375 बालके जीवनसत्वाची कमतरता असलेल्या आजाराने बाधित असल्याचे आढळली. तसेच 46 कोविड सदृश बालकांपैकी 16 बालके पॉजिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व सुस्थितीत आहेत. कुपोषित बालके, गरोदर माता आणि कोमॉरबिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

             गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या नागरिकांना इन्फ्लूएन्झाचे लसीकरण करण्यात येणार असून उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करून 1300 ऑक्सिजन बेड तयार करण्यात येणार आहेत. यातील 20 टक्के बेड बालकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाबाधित मुलांसाठी सर्व डीसीएच, डीसीएचसी आणि कोविड केअर सेंटरमध्ये बेड राखीव करण्यात आले आहेत. माझे मूल माझी जबाबदारी आणि माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत 224 तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. पथकामार्फत 0 ते 18 वर्षे वयोगटातील नऊ लाख 77 हजार 932 बालकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *