BIG 9 NEWS NETWORK
स्मार्ट सिटीच्या स्मार्ट अधिकाऱ्यांनी विविध केलेल्या कामाचा डंका संपूर्ण राज्यभर गाजतोय. हार्ट ऑफ सिटी असलेले श्री सिद्धेश्वर मंदिर आणि तलाव ही एक पुरातन आणि प्रेक्षणीय वास्तू आहे. या परिसरातील कामाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल पंधरा कोटीहून अधिक खर्च झाल्याची माहिती स्मार्ट अधिकाऱ्यांनी दिलेली होती. मागील पाच ते सहा दिवसापासून तलावात गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी सोडले जात असून त्यामुळे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आणि अजूनही लोकार्पण न करण्यात आलेली ओपन जिम गंजत आहे. यामुळे श्रीसिद्धेश्वर भक्तांमध्ये संताप वाढत आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, विविध प्रकारची सुंदर रोपे, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी या निधीतून बसवण्यात आली.पण आम्ही बसवले आमची जबाबदारी संपली या “फिक्स” डोक्यालिटी मुळे ठेकेदार आणि एकाच वेळी दोन पदाची मोठी जबाबदारी पेलणारे स्मार्ट अधिकारी यांनी त्याच्या देखरेखीची आणि संरक्षणाची काळजी घेतली नाही. परिणामी या ठिकाणी असलेल्या भिंतीला भोक पाडून त्यातून गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट ज्या ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आली आहे त्या ठिकाणी पडत आहे त्यामुळे अजून मुहूर्त न लागलेली जिम गंजण्याची शक्यता आहे.MH13 न्यूज ने बातमी प्रसिद्ध करताच महापालिकेचे सभागृह नेते शिवानंद पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख,नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर
नंदी ध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू,सेनेचे नेते प्रताप चव्हाण,महेश धाराशिवकर,परिवहन सदस्य विजय पुकाळे,राकेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.तेव्हा एकाच वेळी दोन मोठ्या पदांची जबाबदारी असलेले धनशेट्टी यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करू असा इशारा दिला होता.पण आज शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना या ठिकाणच्या भिंतीला भोक पाडून ते दुर्गंधी मिश्रित गटारीचे पाणी ओपन जिम मध्ये सोडण्यात आल्याचे निदर्शनाला आले. आणि त्यांच्यात संताप वाढला.
तेव्हा कोण काय म्हणाले…
सोलापूर महापालिकेचे नूतन सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी स्मार्ट सिटीचे अधिकारी संजय धनशेट्टी यांना अल्टिमेटम दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकाराचा मी जाब विचारला आणि काम लगेच करण्यास सांगितले.
तलावात मिसळत असलेले घाण पाणी बंद न झाल्यास आंदोलन करू – नंदीध्वज मानकरी राजशेखर हिरेहब्बू
सिद्धेश्वर तलावामध्ये जे घाण पाणी येत आहे ते अत्यंत निंदनीय आहे. सिद्धेश्वर तलाव हा सिद्धरामेश्वरांनी स्वतःच्या हातून खोदलेला एक तलाव आहे. त्या तलावात जर घाण पाणी मिश्रण होत आहे ते बंद न झाल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा नंदीध्वज मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिला.