Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

बिदर जिल्ह्यातील शालीगावच्या शाळिग्राम या घराण्यातील एक विद्वान वामन भट नावाच्या वेदशास्त्रपारंगत महाभागांच्या पोटी इ.स. १३७५ मध्ये जो पुत्र झाला, तोच मोरया. तो लहानपणापासून अतिशय अभ्यासू आणि चिंतनशील वृत्तीचा होता. आपल्या अखंड अध्ययनशीलतेमुळे दशग्रंथांचे त्याने अध्ययन केले. त्याला ऋषीस्वरुप प्राप्त झाले. लोक त्यांना गोसावी म्हणू लागले. मोरया शाळीग्रामचा मोरया गोसावी असे म्हणू लागले. नंतर त्यांना यात्रेत मोरगावी नयनभारती नावाचे गुरु भेटले. त्यांनी त्यांना दीक्षा दिली. मोरया गोसावींनी त्यानंतर अतिशय कठोर तपश्चर्या केली. कालांतराने त्यांना श्रीगजाननाच्या आशीर्वादाने प्रपंचात पडावे लागले. पुत्रप्राप्ती झाली. प्रत्यक्ष गजाननच पोटी आले या भावनेने पुत्राचे नाव ‘चिंतामणी’ असे ठेवले. यापूर्वी त्यांना कऱ्हा नदीत स्नान करताना तेजस्वी व शेंदरी रंगाचा तांदळा मिळाला होता. त्याची प्रतिष्ठापना चिंचवड येथे त्यांनी केली. वाड्यातील मंदिरात आजही तो सिंहासनाधिष्ठित ‘तांदळा श्रीगणेश’ आपण पाहतो. त्यांनी अनेक चमत्कार केले असल्याचे त्यांच्या चरित्रात दिले आहे. पुढे त्यांनी अनेक गणपतीस्तवने लिहिली.
उदा-
१) पाहता त्रिभुवनी हो दुजा न देखो नयनी |
एका मोरया वाचूनि हो मोक्षदाता ||
२) वाट मी पाहतो रे (देवा) मोरया रे तुझी |
तुचि विश्रांती रे माझी ये मायबाप

बराच काळ लोटल्यानंतर शके १४८३ मार्गशीर्ष वैद्य पष्ठी या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यानंतर त्यांचा वारसा पुत्र चिंतामणी यांनी चालविला.
या घराण्याला देव हे नाव चिंतामणी महाराजांपासून दिले आहे. त्यांच्या नंतर झालेल्या नारायण महाराज (इ.स. १६५८-५९) यांनी समाधी मंदिर बांधले. (१६०५) पुन्हा ते देवघर सन १६७५ मध्ये नारायण महाराज यांनी बांधले. सन १७४० मध्ये झालेले उत्तराधिकारी श्री. धरणीधर महाराज यांनी मोरगावचे देऊळ, थेऊर, सिध्दटेक, चिंचवड येथील भैरवनाथ मंदीर बांधले. मोरया गोसावी यांचे समाधी मंदीर बांधले असल्याचा शिलालेख तेथे आहे.
चिंचवडकर गोसावी यांची ख्याती ऐकून हुमायून बादशाहाकडून तेथील खर्चासाठी दिलेल्या इनामाची सनद उपलब्ध आहे. मोरया गोसावी यास दाखल महसूल व नगदी व पायपोसी व खर्चपट्टी व सरदेशमुखीपट्टी सराफीपट्टी, दैवतपट्टी,ताजीपट्टी,उरुसपट्टी मुकरर सादिलवार व खुषी व मेजवानी व पेशकशी व बकरपट्टी व तूप, तेल, कडबा खरेदी व नगदी, सण, सूत, लोखंड व बाबहाय तालुके ठाणे व तालुके देहेहाय व पालवार व वेठबिगार व फार्मायष व सेवसबाजी व सर्वबाबी इसमी व इसवी ज्या सरकारी दफ्तरात लिहल्या आहेत…. छत्रपती शिवाजी महाराज मोरया गोसावी यांच्या वाड्यात येऊन गेल्याचा आणि त्यांनी नारायण महाराजांकडून अनुग्रह घेतल्याचा उल्लेख, महाराजांच्या आज्ञेवरुन रघुनाथ पंडितांनी लिहिलेल्या ‘राज्यव्यवहार कोश’ किंवा ‘राजकोश’ किंवा ‘राजकोश निघण्टु’ यात श्लोकात आला आहे.

श्लोक-
‘ यः सिध्दिमावहति चिंचवडाधिवासि
हेरबपाद भजनेन महानुभवः|
नारायणाभिधसुधीतिलकादवाप
तस्मादनुग्रहमसौ शिवसार्वभौमः||६६||’

अर्थ – चिंचवड गावात राहणारा, गणेशाच्या कृपेने सिध्दी मिळविणारा, सर्व बुद्धिमतांमध्ये श्रेष्ठ असणारा असा जो नारायण महानुभव त्याच्याकडून सार्वभौम शिवाजीला अनुग्रह प्राप्त झाला. महाराजांनी देवांना देवस्थानच्या खर्चासाठी दिलेल्या सनदाप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचे समजल्यावर सुप्याच्या सरहवालदारास ताकीदपत्र देऊन कळवले. की… इनामाची, किर्दी जे होईल त्याचे हिशेबी पैके वेळचे वेळेस पाववीत जाणे. मागील राहिले असतील तेही देत जाणे. पेस्तरही देत जाणे. यांचा इनाम कसबे पैकी पावे ते करणे पुढे तऱ्ही बोभाट येऊ न देणे… छत्रपती संभाजीमहाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्या जुन्या सनदेचे नूतनीकरण करण्यात आले.
” श्री देवस्वामी वास्तव्य मौजे चिंचवड प्रांत पुणे, बागा व इनाम कारकिर्द निजामशाहा व अंबर कारकिर्द आदिलशाहा व राजश्री महाराजसाहेब व कैलासस्वामी कारकिर्द दर कारकिर्द चालत आले आहे. सबब श्री स्वामी मौजे मजकूर पिढी दरपिढी राहोन अन्नछत्र गरिबगुरीब व फकिर फकिराणा, जो कोणी येतो, त्यास अन्नउदक देत आहेत; याबद्दल गाव इनाम करुन दिल्हा आहे. तेणे प्रमाणे आम्हासही चालवणे अगत्य आहे…” काही वेळा देवस्थानला लोक उपद्रव करित असत, धामधूम करीत रहदारीस अडचण आणीत हे समजल्यावर संभाजीराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना ताकिदपत्र लिहिले. (सन १६८८) त्यात ते लिहितात….”तरी या गावी तुम्हाला धामधूम कराया काय गरज? हे ढंग स्वामीस कैसे मानो पाहतात? याउपरी हा बदराहा वर्तणुक केलिया तुमचा एकंदर मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील, त्याला स्वामी जिवेच मारतील. हे जाणून मौजे मजकुरास तसदी न देणे. बोभाटा येऊ न देणे. ताकीद असे’… यानंतर राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतही दिलेली अनेक इनामपत्रे उपलब्ध आहेत.
संदर्भ –
१. चिंचवड देवस्थान ट्रस्ट-सद्गुरु श्रीमोरया गोसावी.
२. डाॕ. कृ. ज्ञा. भिंगारकर-महासाधू मोरया गोसावी चरित्र
३. डाॕ. सदाशिव शिवदे- महाराणी येसूबाई
४. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे- डाॕ. सदाशिव शिवदे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *