अष्टविनायक | लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

Big9news Network

अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक.

अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.

  • श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा :

गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्यांने अनेक दैत्यांचा संहार केला.

  • श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर :

या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. मुख्य मंदिरा शेजारी एक ५३ फुट बाय ५१ फुट लांब व ७ फुट उंचीचे सभागृह आहे. त्या सभागृहाच्या मध्ये कोठेही खांब नाही. कडेला फक्त ६ खांब आहेत

या मूर्ती इतर अष्टविनायकां प्रमाणे आखीव रेखीव नाही.
या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.

असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.

  • पूजा आणि उत्सव :

दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.

इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.

  • जाण्याचा मार्ग :

पुणे नाशिक महामार्गावर जुन्नरजवळ हे देऊळ आहे. पुण्यापासून अंदाजे ९६ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

  • जवळची इतर दर्शनीय स्थळे :

छत्रपती शिवाजीमहाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला. अंतर ६.२ किमी
ओतूर येथे प्राचीन कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्यस्वामी यांची समाधी. अंतर १७ किमी
कुकडी नदीच्या उगमाजवळील कुकडेश्वर मंदिर. अंतर ८.६ किमी
माळशेज घाटातील अभयारण्य. अंतर २८ किमी
ऐतिहासिक नाणेघाट. अंतर ३३ किमी

||गणपती बाप्पा मोरया||
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वंताची प्रसिध्दी करु नये.

All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : २४ सप्टेंबर २०१५

॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….॥