Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

Big 9 News Network

अहमदनगरच्या कोरोना प्रतिबंधक कामाची खुद्द प्रधानमंत्र्यांनी घेतली दखल !

मुंबई, दिनांक २०: हिवरेबाजारने गावात आरोग्य व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचाराला विरोध होता ते या प्रयत्नामुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच करोनामुक्त हिवरेबाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिली व हिवरेबाजारचा हा करोनामुक्तीचा पॅटर्न पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले.

प्रधानमंत्र्यांनी जाणून घेतल्या यशकथा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांची प्रयत्नांची आणि अनुभवाची ही शिदोरी पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने याच्या व्यवस्थित नोंदी ठेवल्या जाव्यात, जिल्ह्याच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त होतील यादृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचनाही श्री. मोदी यांनी यावेळी केल्या. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी तिसऱ्या लाटेत युवक आणि बालकांना कोरोना लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन बालरोग तज्ज्ञांची टीम तयार करण्यात यावी, बालकांच्या मापाचे छोटे ऑक्सीजन मास्क तयार ठेवावेत, कोरोनामुक्तीसाठी जनजागृती वाढून कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, लसीचा एकही डोस वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी अशा काही सुचनाही यावेळी केल्या.

या व्हिडिओ कॉन्फरंसिंगमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी सहभागी झाले होते.

केंद्रीय आरोग्य सचिवांकडून मुंबईचे कौतूक

बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशभरातील कोविडची स्थिती, उपाययोजना याचे सविस्तर सादरीकरण केले. यात त्यांनी उत्तम ऑक्सीजन व्यवस्थापन आणि कोरोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला ते म्हणाले की, ऑक्सीजनचा बफर स्टॉक करताना अधिकाऱ्यांचे नाव, संपर्क क्रमांक यांची माहिती जाहीर करून ऑक्सीजनची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आले.

कोरोना नियंत्रणासाठी अहमदनगरचे प्रयत्न; माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची मोलाची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात राबविण्यात आलेल्या “माझे कुटुंब- माझी जबाबदारी” अभियानाची याकामी खुप मदत झाल्याचे सांगून डॉ. भोसले म्हणाले की या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत प्रशासनाला पोहोचता आले, त्यातून सहव्याधी असलेल्या लोकांची माहिती मिळाली. त्याना योग्य मार्गदर्शन तसेच संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करणे शक्य झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवतांना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या कोविड प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार पद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरू केलेल्या “माझा डॉक्टर” उपक्रमातून राज्यभरातील डॉक्टरांना राज्य टास्कफोर्स च्या तज्ज्ञांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याची माहिती ही डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.

समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती

जिल्ह्यात प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला. त्यामुळे कामात सुसुत्रता आली. कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांकडून आकारले जाणारे शुल्क या सर्व कामात या समन्वयक अधिकाऱ्यांची मदत झाली. गावपातळीवरील यंत्रणेला या कामात सहभागी करून घेण्यात आले. तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. हे करतांना “आपला गाव- आपली जबाबदारी” ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडण्यात आली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांचे गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले. रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये नेऊन उपचार करण्याचे धोरण ठरवल्याने संसर्ग रोखण्यास मदत झाली असेही ते म्हणाले.

ऑक्सीजन व्यवस्थापन

जिल्ह्यात ऑक्सीजनची उपलब्धता, वितरण करण्यासाठी समन्वयक टीम स्थापन करण्यात आली. या टीमने संपूर्ण जिल्ह्यातील ऑक्सीजनची मागणी आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन केल्याने जिल्ह्यात ऑक्सीजनसाठी पॅनिक स्थिती निर्माण झाली नाही. १४ ग्रामीण रुग्णालयांच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट विकसित करण्यात येत असून यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त १७५० ऑक्सीजन बेडची निर्मिती होऊ शकेल असेही जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, गर्दी होणार नाही, शारीरिक अंतराचे पालन होईल, मास्क व्यवस्थित वापरला जाईल, हातांची स्वच्छता राहील यादृष्टीने आवश्यक उपाययोजना व जनजागृती केल्याची माहिती ही त्यांनी दिली. या सर्व उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा पॉझेटिव्हिटी रेट कमी होण्यास मदत झाल्याचे ही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केले डॉ. भोसले यांचे अभिनंदन

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या कोरोना प्रतिबंधक कामाची दखल खुद्द प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी घेऊन त्यावर समाधान व्यक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले व ते करत असलेले कौतूकास्पद काम यापुढेही सुरु ठेवावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *