Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

बार्शी तालुक्यातील रातंजन येथील बापू दत्तू नागटिळक यांच्या शेतामध्ये वेळ आमावस्याची पूजा करण्यात आली.अतिशय आनंदमय वातावरणात शेतात साजरा करण्यात आली. त्यावेळी गौतम नागटिळक बिरु नागटिळक माधुरी नागटिळक , सीता डोळस , दिपाली चौधरी , दुर्गा नागटिळक, माया सुरवसे , गीता बनसोडे , कृष्णा बनसोडे , भैरवनाथ चौधरी , ममता वाघमारे, सोनू वाघमारे , साहिल डोळसे ,श्रीहरी हजारे इत्यादी उपस्थित होते .

शेतातील उत्पन्नाची सम्रद्धी भरमसाठ होण्याची मनोकामना व्हावी म्हणून मनोभावे काळ्या आईची पूजा असंख्य शेतकरी करतात. गत दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असल्याने शेतशिवार हिरवेगार झाल्याचे दिसून येत आहे.

वेळ अमावस्या म्हणलं की शेतकऱ्यांसाठी काळ्या आईच्या पुजेचा सण या सणाला ग्रामीण भागात मोलाचे स्थान आहे. वेळ अमावस्या म्हणल की लहान मुलं, महिला, पुरुष सर्वासाठी एकत्र येऊन शेतशिवारात जाऊन आनंदात पांडवांची पूजा करून साजरा करण्याचा दिवस असतो.

मुळ कर्नाटकातील असणारा सण महाराष्ट्रातील उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.

या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली “भज्जी”, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.

काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.

एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.

अमावस्येनिमित्त खाण्याची जणू मेजवानीच असते. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, अंडे, धपाटे, शेंगा चटणी, वरण अशा विविध प्रकारचा मेनू असतो. त्यामुळे एरव्ही शेतीकडे बगल देणारी माणसे सगळीकडे हिरवेगार बागायत असल्याने शेतीची वारी करू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परळी, सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी जोपासली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *