Big9news Network
इंडियन मॉडेल स्कूल विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम करण्यात अग्रेसर असते. नवीन तंत्र शिक्षण व इंग्रजी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आपल्या परंपरांची माहिती होणे सुद्धा आवश्यक आहे .या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे मागील जवळपास दोन वर्षापासून विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकले नाहीत.
या विद्यार्थ्यांना आता नक्की शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांची ही उत्सुकता लक्षात घेऊन इंडियन मॉडेल स्कूलने दिवाली मेळाचे आयोजन केले आहे. यामध्ये दिवाळीत साजऱ्या होणाऱ्या विविध दिवसांची माहिती देणार्या स्टॉल्स ते आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वसुबारस,, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी ,लक्ष्मीपूजन पाडवा व भाऊबीज हे विविध दिवस पारंपारिकरित्या कसे साजरे केले जातात याची माहिती देण्यात आली व त्यांचे महत्त्व सांगण्यात आले. वसुबारस दिवशी गाय वासरांची पूजा केली जाते. व यातूनच पशुसंवर्धनाच्या आणि मात्रांवर दया करण्याचा संदेश पुरातन काळापासून दिला असल्याचे समजते. धनत्रयोदशीला प्रत्यक्ष धनवंतरीनी आयुर्वेदाचे निर्माण केले. त्यामुळे या दिवशी धन्वंतरीचे पूजन केले जाते व आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला जातो. अन्याय करणाऱ्या नरकासुराचा वध श्रीकृष्णाने चतुर्दशी दिवशी केला व त्याच्या बंदिखान्यात असलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांची सन्मानाने सुटका केली तो हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून साजरा केला जातो या दिवशी अभ्यंग स्नानाची परंपरा आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला महत्वाचा दिवस या दिवशी सगळीकडे दिव्यांची आरास करून अंधाराला जळू हरवले जाते व धनाची पूजा केली जाते. बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा हा अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी चा उत्तम मुहूर्त आहे या दिवशी व्यापारी लोक वही पूजन ही करतात.
बहिण-भावाचे नाते दृढ करणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज अशाप्रकारे शाळेतील शिक्षकांनी त्यात या सणाचे दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. एवढेच नाही तर मातीच्या पणत्या कशा बनवल्या जातात याचे प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यंदाच्या दिवाळीत प्लास्टिक टाळून मातीच्या पणत्या घ्या व निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा असा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश यातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. मोबाईल गेम खेळण्यापेक्षा मुलांनी स्वतःच्या हातांनी पणत्या रंगवाव्यात आणि दिवाळीचा आनंद घ्यावा .यासाठी पणत्या रंगवण्याचे प्रात्यक्षिक देखील शाळेतील कला शिक्षकांनी दाखवले. या शिवाय भव्य आकारामध्ये पन्हाळगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असून त्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विविध किल्ल्यांची माहिती देण्याचा हा उपक्रम स्कूल मध्ये मागील सहा वर्षापासून राबवण्यात येत आहे. या दिवाळी मेळा २०२१ चे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ए.डी.जोशी सर व संचालिका सायली जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाबरोबरच आपल्या परंपरांची माहिती होणे आवश्यक असल्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सायली जोशी यांनी दिली. या दीपावली मेळा २०२१ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना जवळ जवळ दोन वर्षांनी स्वतःच्या शाळेत येण्याचा आनंद उपभोगता आला असल्याची प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. दिवाली मेलाची संकल्पना सचिवा सायली जोशी यांची आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.