Big9news Network
शिक्षण विभागानंतर सीईओ स्वामींनी आता आरोग्य विभागाकडे आपला मोर्चा वळविला आहे. “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” अभियानाच्या यशा नंतर स्वामींनी आता जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे सौंदर्यीकरण व सक्षमीकरण करण्याचे ठरविले आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानाची दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेवून राज्यभर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्यात हातखंडा असलेले दिलीप स्वामी यांचा “अभिनव उपक्रम-संकल्पनेचे शिलेदार” म्हणून नावलौकिक झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी संजिवनी आहेत. ग्रामीण भागातील जनतेला यथायोग्य आरोग्य सेवा पूरविणे हे आरोग्य विभागाचे प्राधन्यक्रम कार्य असून कर्तव्ये आहेत. त्यासाठी जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे सक्षमरित्या व पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत रहाणे अत्यंत आवश्यक आहे.
- सध्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विशेषत: शहरापासून दूर असलेल्या प्रा.आ.केंद्र वा उपकेंद्राची सेवा यथायोग्य रितीने होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात.
- आरोग्य केंद्रात डॉक्टर/कर्मचारी हजर नसणे, औषध उपलब्ध नसणे, इतर आवश्यक साहित्य नसणे यासारख्या तक्रारी येत असतात.
- आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर,कर्मचारी हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेशी सौजन्याने न वागणे, हिरीस-फिडीस करणे, टाकून बोलणे यासारखेसुध्दा प्रकार होत असतात, तशा तक्रारीदेखील येत असतात.
- प्रा.आ.केंद्र/उपकेंद्राची भौतिक अवस्थादेखील चांगली नाही, काही प्रा.आ.केंद्र हे अत्यंत शुभक व हरीतरित्या सजवले आहेत, परिसरात फुलांची झाडे, हिरवीगार वनस्पती, स्वच्छता यांनी केंद्र भरभरुन दिसते, तर दुसरीकडे काही प्रा.आ.केंद्राची अतिशय दुरावस्था झालेली आहे.
- काही प्रा.आ.केंद्र/उपकेंद्राचे परिसरात खूप झुडपे, गवत वाढलेले आहे, अस्वच्छता आहे, भिंती/इमारतींचा रंग पूर्णपणे उडून गेला आहे, आतसुध्दा नको ते साहित्य,धूळ इत्यादी भरगच्च दिसते आहे.
- या सर्व कारणांमुळे जिल्हाभर प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रांचे सक्षमीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी एक अभियान घेण्याचे निश्चित करण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण –
- प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र सर्व दृष्टीने सक्षम रहाणेसाठी आरोग्य अधिका-याची बैठक घेऊन आवश्यक त्या वैद्यकीय सुविधांबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.
- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व नियमित आरोग्य सेवा त्यात येणा-या अडचणी व भविष्यातील निकड लक्षात घेऊन जिल्हयाचा एक आराखडा तयार करण्यात आलेला असून तो नियोजन विभागाला देण्यात आलेला आहे, त्यामुळे या बाबींवर येथे सविस्तर उल्लेख करण्यात येत नाही.
- या भौतिक वस्तु, उपचार यंत्र, साहित्याचा प्रस्ताव आहे. केंद्र सक्षमीकरणासाठी आणखी काही गोष्टी प्राधान्याने कराव्या लागणार आहेत,त्यासाठी पुढील बाबींसाठी निर्देश देण्यात येत आहेत.
- प्रशिक्षण –
प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रांशी संबंधित सर्व डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी व सर्व स्टाफ यांचे नियमित सर्व प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, जेणेकरुन त्यांचे वैद्यकीय ज्ञान अद्ययावत होईल. यासाठी जिल्हास्तरावरुन व तालुका स्तरावरुन विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावेत. जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक व प्रशिक्षण केंद्राचे संचालक यांचेवर ही जबाबदारी देण्यात येत आहे.
- वक्तशीरपणा / पूर्णवेळ कार्यरत रहाणे –
आरोग्य केंद्रातील डॉक्टर व स्टाफ हे पूर्णवेळ कार्यरत राहत नाहीत, दूरवरुन ये-जा करतात. याबाबत नेहमी तक्रारी येत असतात. व काही बाबतीत हे सत्यदेखील आहे. याद्वारे सर्वांना सक्त ताकीद देण्यात येत आहे कि, डॉक्टर व स्टाफ यांनी त्यांचे केंद्रात पूर्णवेळ कार्यरत हजर रहावेत. काही कारणास्तव सभा व प्रशिक्षण वा इतर कारणास्तव केंद्रात हजर रहाणे शक्य नसल्यास तशी परवानगी तालुका आरोग्य अधिकारी /जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून घेऊनच जावे.
- प्रा.आ.केंद्राच्या /उपकेंद्राच्या ज्या वेळा आहेत, त्या वेळेत डॉक्टरसह सर्व स्टाफ पूर्णपणे हजेरीपटाप्रमाणे हजर रहावेत.
- प्रत्येक प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रावर कार्यरत डॉक्टर, स्टाफ यांचे हजेरीपट ठेवण्याबाबत सुचित करण्यात येत आहे, त्याची नियमित तपासणी करण्यात येईल. यापुढे गैरहजेरीबाबत गंभीर दखल घेण्यात येणार असून कडक कार्यवाही केली जाईल.
- आरोग्य केंद्राचे आतील स्वच्छता व निटनेटकेपणा –
बऱ्याच प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रात आतील स्वच्छता ही पुरेशी नसते, फाईल्स, मेडिकल बॉक्स, जुन्या फर्निचर इत्यादी अस्ताव्यस्त पडलेले दिसते. जाळया-धूळ प्रचंड प्रमाणात दिसून येते. तरी या उपक्रमाअंतर्गत सर्व प्रा.आ.केंद्र व उपकेंद्राने आतील स्वच्छतेचे कार्य हाती घ्यावे. त्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वतोपरी सहकार्य करावे,
- रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेशी सौजन्याने वागणे –
आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेशी काही ठिकाणी व्यवस्थित बोलले जात नाही, हिडीस-फिडीस केले जाते, हाकलून लावणे असे प्रकार कधीकधी काही ठिकाणी घडत असतात, ते आता यापुढे घडता कामा नये. असे घडल्यास वा तक्रार आल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.
त्यासाठी उपस्थित सर्वांनी आपापल्या केंद्रात सौजन्यपूर्ण वागणुकीसंदर्भात शपथ घेण्याचा कार्यक्रम दि.10 जानेवारी 2022 रोजी घेण्यात यावा.
सौंदर्यीकरण –
काही प्रा.आ.केंद्रांची इमारत व परिसर अतिशय स्वच्छ,सुंदर व निसर्गरम्य आहेत, ज्यांनी हे केले आहे त्यांचे अभिनंदन. परंतु काही प्रा.आ.केंद्र /उपकेंद्र हे अतिशय अस्वच्छ परिसर, झाडेझुडपे वाढलेले, गवत प्रचंड प्रमाणात उगविलेले, वॉलकंपाउंड एकदम जुनाट झालेले दिसून येतात.
काही प्रा.आ.केंद्राच्या इमारती,भिंती अतिशय जुनाट /मळक्या वाटत आहेत/दिसून येत आहेत.
त्याकरिता सर्व प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रांचे पुढीलप्रमाणे कार्यक्रम हाती घ्यावेत.
- परिसर स्वच्छता, आवारातील गवत व झुडपी पूर्णपणे काढून टाकणे.
- इमारत, वॉलकंपाउंड, प्रवेशद्वार यांचे रंगरंगोटी, साफसफाई करुन घेणे.
- परिसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपण करुन घेणे, फुलांचे झाडे लावणे व परिसर हिरवागार होईल असे पाहणे.
- अभ्यागतांसाठी, येणारे रुग्ण,त्यांचे नातेवाईक यांना बसणेसाठी व्यवस्था करणे. त्याचबरोबर दिव्याची,पाण्याची व्यवस्था करणे.
- इमारत, वॉलकंपाउंड, भिंती हया बोलक्या करणे, योजनांचा प्रसार-प्रचार करणे, सुचना/मार्गदर्शक लिहिणे.
यावर इतर अनुषंगीक बाबी आपणांस करता येतील.
स्वखर्चाचे नियोजन :-
- वरील सर्व कार्यासाठी ग्रामपंचायत/पंचायत समितीने प्रा.आ.केंद्राला यथायोग्य मदत करावयाचे आहे. निधी द्यावयाचा आहे.
- रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातूनही निधी घेता येईल.
- शक्यतो ग्रामस्तरावर ‘ लोकवर्गणी ‘ उभी करुन काम केल्यास स्वागतार्ह राहील.
- परिसरातील सेवाभावी संस्था, विविध संघटना, पतसंस्था यांचेदेखील सहकार्य घेता येईल.
- आपापल्या कार्यक्षेत्रातील बँका, कंपनी यांचेकडून CSR फंड घेऊनही हे सौंदर्यीकरणाचे काम करता येईल.
- सदर अभियानाची सुरुवात दि. 1 जानेवारी 2022 पासून करण्यात यावी.
- दि. 1 जानेवारी 2022 रोजी प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रातील आतील व बाहेरील 8/10 फोटो काढून स्वाक्षरी करुन ठेवावे.
- अभियानाचे कार्य संपल्यानंतर पुन्हा 8/10 फोटो काढून स्वाक्षरी करुन ठेवावे.
- तुलनात्मक कार्य पाहून “उत्कृष्ट कार्य” साठी प्रत्येक तालुक्यातील एक प्रा.आ.केंद्र निवडण्यात येतील.
- उत्कृष्ट कार्य करणा-या प्रा.आ.केंद्र /उपकेंद्राचे यथोच्छ गौरव व सत्कार मा. पालकमंत्री, मा. अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात येईल.