- म्युकरमायकोसीच्या रुग्णांना मोठा दिलासा
- खासगी रुग्णालयांना उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी
मुंबई, दि. १ : – राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.
राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री श्री. टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील.
संबंधित रुग्णालयाने रुग्णाला पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
*म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.*
*वॉर्डमधील अलगीकरण:* अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.
*व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण:* अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये
*व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण :* अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये
*अ वर्ग शहरांत* मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.
*ब वर्ग शहरांमध्ये* नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे.
*क वर्ग गटात* अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे म्युकरमायकोसीस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.
Leave a Reply