Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

BIG 9 NEWS NETWORK

“ही गगनभरारी पंखी आपुल्या विश्वासाचे बळ” या बँकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सोलापूर जनता सहकारी बँकेने यावर्षी अतिशय नियोजनपूर्वक काम करून मागील वर्षाचा ११.८६ कोटीचा तोटा भरून काढून नफ्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. तसेच निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण अंदाजे ६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक बँकेस रिझर्व बँकेच्या नियमानुसार काही आर्थिक तरतुदी करणे क्रमप्राप्त असते.या आर्थिक तरतुदींमुळे मागील वर्षात बँकेला काही प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. मात्र २१ -२२ या आर्थिक वर्षात मा.संचालक मंडळाचे कुशल मार्गदर्शन, कडक अनुशासन आणि अधिकारी, सेवक यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे व बँकेने प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या चांगल्या वसुलीमुळे सोलापूर जनता सहकारी बँकेने आवश्यक आर्थिक तरतुदी करुनदेखील निव्वळ नफा मिळवला आणि सोलापूर शहरातील सहकार क्षेत्रात पसरलेली मरगळ दूर करण्याचा प्रामणिक प्रयत्न केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष श्री. बंग म्हणाले.

येत्या आर्थिक वर्षातही बँकेने आणखीन चांगले काम करून चांगला नफा कमविण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे मत यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, बँकेने गृहकर्ज व चारचाकी वाहनकर्जासाठीचे व्याजदर हे सिबिल स्कोअर शी लिंक करून हे व्याजदर ७.९०% इतके खाली आणले आहेत व ग्राहकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.तसेच प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करून ग्राहकांच्या आणि विशेषतः ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरू असा विश्वास देखील यावेळी समस्त संचालक मंडळाने व्यक्त केला.

बँकेची २१ -२२ या आर्थिक वर्षातील प्रगती पाहून बँकेच्या कामकाजात मदत व मार्गदर्शन व्हावे या हेतूने भारतीय रिझर्व बँकेने कॉलेज ऑफ अग्रीकल्चर बँकिंग पुणे येथील उपसरव्यवस्थापक आशीष श्रीवास्तव यांची संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे, असे बँकेचे अध्यक्ष श्री. वरदराज बंग यांनी पत्रकारांना सांगितले.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, संचालक ऍड. प्रदिपसिंह राजपूत, संचालक सी.ए. गिरीष बोरगावकर, संचालक सुनिल पेंडसे, संचालक पुरूषोत्तम उडता, पिग्मी व बचतगट विभाग प्रमुख मदन मोरे आदी उपस्थित होते.

कोरोना काळातही बँकेची कामगिरी समाधानकारक

बँकेवरील असंख्य ग्राहक, सभासद आणि हितचिंतक यांचा असलेला विश्वास ख-या अर्थाने सार्थ ठरवीत सोलापूर शहरातील सहकार क्षेत्रात काही अप्रिय घटना व कोरोना सारखे महासंकट अशा पार्श्वभूमीवर बँकेने कमविलेला निव्वळ नफा हा खरोखरच अभिनंदनीय आणि कौतुकास पात्र असा आहे, असे बँकेचे अध्यक्ष श्री. बंग यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *