कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या नावामुळे विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राला विशेष महत्त्व -डॉ. बोधले

Big9news Network

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राला कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे नाव देण्यात आल्यामुळे या ज्ञानस्त्रोत केंद्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन उद्घाटक संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराज यांनी केले.

गुरुवारी, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र” असे नामकरण करण्याचा सोहळा सामाजिकशास्त्रे संकुल सभागृहात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. बोधले महाराज बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, बार्शीचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश माने, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. डॉ. व्ही. बी पाटील आदी उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉ. एस.के. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर केला. यावेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्र नामकरणाची माहिती विशद केली.

ह. भ. प. डॉ. बोधले महाराज म्हणाले की, ‘उजळावया आलो वाटा’ या उक्तीप्रमाणे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे कार्य अलौकिक होते. ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नव्हती, अशा ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना अज्ञानातून ज्ञानप्राप्ती कडे नेण्याचे मोठे कार्य डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी केले. तसेच आरोग्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या. मी देखील मामासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेले आहे. मामांचा विद्यार्थी हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे.

मामासाहेबांचे कार्य एखाद्या संतापेक्षा तसूभरही कमी नव्हते, असे सांगून बोधले महाराज म्हणाले की, या ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी माझ्या परीने जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल. या विद्यापीठात मामासाहेबांच्या नावे अध्यासन व्हावे असे मला वाटत होते, पण त्याहीपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानस्त्रोत केंद्राला मामासाहेबांचे नाव देण्यात आले, याचा मला खूप आनंद आहे.

माजी मंत्री सोपल म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील ज्ञानगंगेचे उगमस्थान कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आहेत. मामा स्वतःच एक विद्यापीठ होते. त्यांचे नाव विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राला देणे समर्पक आहे. आमदार राऊत म्हणाले की, बार्शी तालुक्याचे आराध्यदैवत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतून असंख्य विद्यार्थी घडले, तसेच त्यांनी निर्माण केलेल्या आरोग्य सुविधेमुळे बार्शी मेडिकल हब बनले आहे. यापुढच्या काळातही आणखी मोठे कार्य या माध्यमातून घडेल अशी आम्हाला आशा आहे.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, विद्यापीठाला उंचीवर नेण्यासाठी समाजातील मान्यवरांची, उद्योगांची तसेच संस्थांची साथ असणे आवश्यक असते. या सोहळ्यातून हे अचूकपणे घडले आहे. असा सोहळा प्रत्येक महिन्यात व्हावा असे मला वाटते. विद्यापीठाला अशा प्रकारची साथ देणारे उपक्रम जर घडत गेले तर विद्यापीठाच्या लौकिकात मोठी वाढ होऊ शकेल. या विद्यापीठाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव आहे, त्यासोबतच ज्ञानस्रोत केंद्राला कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचे नाव दिल्याने त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी या दोन महान व्यक्तींनी दिलेल्या मूल्यांची जोपासना आपल्या जीवनात केली तर तीच खरी आदरांजली होऊ शकेल, अशी अपेक्षाही कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. बी. वाय. यादव यांनी यापुढेही विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राला लोकवर्गणीतून मदत करून जागतिक दर्जाचे केंद्र करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी मानले.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे “कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र” असे नामकरण सोहळ्याप्रसंगी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, ह.भ.प. जयवंत बोधले महाराज व अन्य