BIG 9 NEWE NETWORK
श्री सिद्धरामेश्वरांचे अष्टविनायक
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये (सोन्नलगी) शहरावर कोणतिही नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांची दिशा, निर्देशात्मक स्थान व त्यांची नावे यासंबंधीची तपशीलवार माहिती १३ व्या शतकात कर्नाटकातील हंपी येथे होऊन गेलेले विद्वान कवी राघवांक यांनी सिद्धरामाच्या चरित्रात लिहून ठेवली आहे.
राघवांक कवीने वर्णन केल्याप्रकरणी श्री गणेशाच्या सर्व आठही मूर्ती आजसुध्दा सोलापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळतात. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या या अष्टविनायकांची माहिती आजपासून आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
1) पहिला गणपती
वीरेश तथा वीर गणपती,
अक्कलकोट रोड
पूर्व दिशेला वीरेश गणपती
दक्ष असे नित्यानित्यविवेकी।
दुष्ट दुर्जन माणसे पाहुनि
संहार तयाचा तात्काळ करी।।
श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेला पहिला गणपती म्हणजे श्री वीरेश तथा वीर गणपती होय. सोलापूरच्या पूर्व दिशेला अक्कलकोट रोडवर श्री वीरेश गणपतीचे मंदिर आहे. ही छोटी पण अतिशय सुबक मूर्ती आहे.
पूर्व भागातील सुताचे व्यापारी व दानशूर उद्योगपती मोगलप्पाअण्णा पोगूल यांनी येथे स्वखर्चातून स्वतःच्या जागेत नवे मंदिर बांधून जीर्णोध्दार केला. श्री गणेशाच्या मंदिराबरोबरच भगवान शंकर म्हणजेच महादेवाची पिंड, भगवान विष्णुदेव, आई अंबाबाई, भगवान सूर्यनारायण व रामभक्त हनुमान या देवदेवतांची मंदिरे तिथे आहेत. याठिकाणी श्रीगणेशाच्या पूजेसाठी पुजारी असून तेथे आता रोज पूजा-अर्चा आणि सायंकाळी दिवाबत्ती होते.
मंदिरांचा परिसर अतिशय शांत व निसर्गरम्य असून त्या ठिकाणी गेल्यानंतर भक्तांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना अनेक भक्त बोलून दाखवितात.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मकर संक्रांतीच्या वेळेस होणाऱ्या यात्रेचा प्रारंभ देखील या विघ्नहर्त्या वीर गणेशाच्या पूजनाने करण्यात येतो. तसेच पूर्वीच्या काळी सोलापूरहून श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या यात्रेस जाणारे भाविक यात्रेकरु आपला पुढील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या गणपतीची प्रथम पूजा करुन नंतर यात्रेस आरंभ करीत असत.
Leave a Reply