Big 9 News Network
मंत्रिमंडळाची तीन वाजता महत्त्वाची बैठक,लॅाकडाऊनबद्दल होऊ शकतो निर्णय
मुंबई : महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन संदर्भात निर्णय दोन दिवसात जाहीर करू असं शुक्रवारच्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा एकच पर्याय असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल झालेल्या एका बैठकीत सांगितलं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्र संपादक, मालक आणि वितरक यांच्याशी लॉकडाऊनच्या विषयावर चर्चा करुन लॉकडाऊन व्यतिरिक्त काही दुसरा पर्याय आहे का याबाबत माहिती घेतली. या सर्व बैठकांमधून महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा असल्याची मुख्यमंत्र्यांची खात्री झाल्याचं सांगितलं जात आहे.आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये वाढता कोरोना संसर्ग आणि त्यावर सरकारतर्फे उचलण्यात येणारी पावलं यावर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याचा निर्णयही घेण्यात येऊ शकतो.गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्याचं अनेक बैठकांचं सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात काल विक्रमी 49 हजार 447 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.