शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी :
माढा तालुक्यातील सोलंकरवाडी या गावात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे शनिवारी दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 10.30 च्या सुमारास भिंगारे यांच्या शेतात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर -पुणे हायवेवर असलेल्या माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथील अर्जुन मच्छिंद्र भिंगारे यांच्या शेतात केळीची बाग आहे. केळीच्या बागेत भिंगारे बंधूंना चिखलात बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आढळले.दरम्यान, त्यांनी पाहणी करत पुढे जात असताना त्यांना बिबट्याच्या पिल्ल्याचेही ठसे आढळून आले. यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.त्यांनी तात्काळ वन विभाग व पोलीस विभागाला याची माहिती दिली असता पोलिस व वन विभागाने त्याची पाहणी करून ते ठसे बिबट्याचे नसून तरस या प्राण्याचे असल्याचे मोहोळ वन विभागच्या वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.