दि.१३ : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याबरोबरच मृतांचीही संख्या वाढत आहे. अनेक देशात लसीकरण सुरू आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढत आहे. मृतांची संख्या वाढत आहे. भारतासह जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून बाधितांची आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जगभरातील अनेक देशांनी विविध उपाययोजना आखूनही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचे संकट आणखी भयंकर रूप घेण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. जगभरात मागील काही महिन्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा जोर पकडला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मारिया वान केरखोवे यांनी एका चर्चे दरम्यान सोमवारी हा इशारा दिला. त्यांनी सांगितले की, जगभरात कोरोनाची बाधा झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. आता कोरोनाच्या संकटाने जोर पकडला असून महासाथीचा आजार वेगाने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
मारिया यांनी सांगितले की, मागील आठवड्यात कोरोनाची लागण झालेले ४४ लाख रुग्ण आढळून आले. कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना आखूनही १६ महिन्यांनंतर ही स्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीला सजग राहण्याची आवश्यकता असून या भयंकर परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलावीत यावर अधिक गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
मागील आठवड्यात जगभरात कोरोना बाधितांच्या प्रकरणात ९ टक्के वाढ झाली असून कोरोना बळींच्या संख्येत पाच टक्के अधिक वाढ झाली आहे.
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १३.५८ कोटींहून अधिक झाली आहे. तर, २९ लाख ३० हजाराहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. तर, कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानावर असून ब्राझील तिसऱ्या स्थानी आहे.