दि.१३ : महाराष्ट्रातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. यापूर्वीच मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच मोठा निर्णय घेणार असून, त्याची नियमावली आजच जाहीर होईल, असे विधान मुंबईचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी केले आहे.
लॉकडाऊनबाबत माहिती देताना अस्लम शेख म्हणाले की, आम्हाला कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे, लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आजही परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही शेख यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राय खासगी रुग्णालयात वेटिंग लिस्ट आहे. मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटरमध्ये अद्यापही बेड आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली.