सोलापूर,दि.1: रेल्वेने महाराष्टातून कर्नाटकात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक करण्यात आली आहे. तुम्ही जर रेल्वेने कर्नाटकात जाणार असताल तर आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. आता कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याशिवाय तुम्हाला रेल्वेने कर्नाटकात जाता येणार नाही. त्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक असून, 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांकडे कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून रेल्वेने कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करून रिपोर्ट आल्यानंतरच प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.
कर्नाटक राज्यातील रेल्वे स्थानकांवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. कोरोना चाचणी अहवाल नसलेल्या प्रवाशांना स्थानकाबाहेर पडू दिले जाणार नसल्याने प्रवाशांनी आधीच कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट बाळगणे गरजेचे आहे. प्रवाशांना किमान चार दिवस आधी चाचणी करावी लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगावा आणि सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. आपला प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून करण्यात आले आहे.