मराठा आक्रोश मोर्चा | मागासवर्गीय आयोगाने तात्काळ सर्व्हे करुन अहवाल सादर करावा; नरेंद्र पाटील

Big9news Network

मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी मराठा नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणाराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही प्रमुख मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणाराय. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळल्याने आता राज्यशासनाने तात्काळ मागासवर्गीय आयोगाला सक्रिय करावे. मागासवर्गीय आयोगाला तात्काळ सर्व्हे करायला लावून लवकरात लवकर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तयार करावा आणि सादर करावा. यासाठी राज्यपालांची, पंतप्रधानांची मदत घ्यावी पण मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, राज्य शासनाने कोणतीही भरती काढू नये अन्यथा तुमची भूमिका मराठा द्वेष्टी आहे असे दिसेल. आमच्या आंदोलनाची सुरुवात सोलापुरातून आहे मात्र महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चा निघणार आहे. काही लोक या मोर्चाला वेगळा रंग लावत आहेत मात्र आमचा मोर्चा सर्वपक्षीय आहे. आज मी सुशीलकुमार शिंदे यांना भेटलो तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना भेटलो त्यामुळे उद्या सत्तांतर झाले तर त्याविरोधातही आम्ही मोर्चा काढणार आहोत.

घटनादुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार : नरेंद्र पाटील

मराठा आरक्षणाची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे . त्यामुळे लवकरच 102 वी घटना दुरुस्तीसाठी लवकरच केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार आहे.

शरद पवारांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र पाटील

ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचा राजकीय प्रवास, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा काळ पाहिला तर त्यांचा उल्लेख द ग्रेट मराठा असा होतो. मात्र सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यापासून शरद पवारांनी मराठ्यांच्या बाजूने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मराठा आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली

सोलापुरात 4 जुलै रोजी होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.