Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..
  • महाविकास आघाडी सरकारने ब्रिटिशांपेक्षासुद्धा वाईट वागणूक दिली असल्याचा नरेंद्र पाटील यांचा आरोप
  •                    एक मराठा लाख मराठाच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

सोलापूर –  आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात  मराठा आक्रोश मोर्चा निघाला. सोलापूर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती तरीसुद्धा संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांची मोठी पंचायत झाली. सोलापूर आणि जिल्हाभरातून हजारो मराठा आंदोलक सोलापुरात येणार असल्याने मोर्चाला नेमके कसे रोखायचा असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आणि पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी शहर आणि ग्रामीण भागात ठीकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. सोलापूर शहराकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिस बंदोबस्त लावल्याने आंदोलकांना सोलापूर शहरात येता आले नाही.

दरम्यान पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे भाजप आमदार समाधान आवताडे, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, विधानपरिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि अक्कलकोटचे भाजप आमदार  सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधीना ग्रामीण भागातच पोलिसांनी अडविले.त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा होता. मात्र आमदारांना अडविल्याचे समजताच माजी आमदार नरेंद्र पाटील संतापले आणि जोपर्यंत अडकून पडलेले आमदार सोलापूर शहरात येत नाहीत तोपर्यंत मोर्चा जागेवरून निघणार नाही असा आक्रमक पवित्र घेतला. त्यामुळे तणावाची परिस्थिती ओळखत पोलिसांनी आमदारांना सोलापुरात येण्यास परवानगी दिली आणि आमदार सोलापुरात मोर्चासाठी पोहोचले. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे सांगोलावरून निघाले खरे मात्र पोलीस त्यांना ताब्यात घेतील म्हणून त्यांनी आजाराचे नाटक करत तोंडाला कापड गुंडाळून व हाताला सलाईन लावून ऍम्ब्युलन्समधून पोलिसांनी चकवा देत सोलापूर गाठले आणि ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले.

दरम्यान छत्रपती संभाजी महाराज चौकातून सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा पोलिसांच्या दडपशाहीमुळे दुपारी दीड वाजता निघाला. गर्दीचे कारण पुढे करून पोलिसांनी मराठा आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. मोर्चाच्या सर्वात समोर आणि दोन्ही बाजूला ११० पोलीस अधिकारी,१२०० पोलीस अंमलदार,५०० होमगार्ड जवान तसेच एसआरपीच्या तीन तुकड्या यासह शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

या मोर्चामध्ये माढा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत,सोलापूर शहर उत्तरचे  आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी,विधानपरिषदेचे भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, पंढरपूर-मंगळवेढाचे भाजप आमदार समाधान आवताडे ,सोलापूर महानगपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, अनंत जाधव ,श्रीमंत कोकाटे,शहाजी पवार,इंद्रजित पवार,राम जाधव, किरण पवार, राजू सुपाते ,श्रीकांत देशमुख, धैर्यशील मोहिते-पाटील, शिवानंद पाटील, श्रीनिवास करली, विनायक विटकर, श्रीकांत घाडगे,अमर पुदाले, संजय कोळी, परिनीता शिंदे आदी उपस्थित होते.

बॅरिकेड्स लावून पोलिसांकडून रस्ते बंद

सोलापूर शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हैदराबाद रोड, विजापूर नाका, तुळजापूर नाका, जुना पुना नाका, देगाव नाका, होटगी नाका याठिकाणी पोलिस मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तासाठी नियुक्त केले होते. सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघणार होता, तत्पूर्वी ग्रामीण पोलिसांनीही तालुक्याच्या ठिकाणाहून निघणाऱ्या आंदोलकांना त्याच ठिकाणी अडवले. दरम्यान सोलापूर शहरात आंदोलनाचा जो मार्ग होता तो मार्ग वगळता अन्य मार्गांवर बॅरिकेड्स लावून संपूर्ण मार्ग बंद करून टाकण्यात आले होते.

लोकप्रतिनिधीचा रस्त्यावरच ठिय्या

मराठा आक्रोश मोर्चासाठी आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह आदी लोकप्रतिनिधी सोलापूर शहराच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत मराठा समाजातील तरुणांचाही मोठा फौजफाटा होता. त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी त्याच ठिकाणी रस्त्यांवर ठिय्या आंदोलन केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांना पुन्हा सोलापूर शहराकडे येण्यास परवानगी देण्यात आली.

 आरक्षण आमच्या हक्काचं….. 

आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही,  छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, नरेंद्र पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. घोषणांनी संभाजी महाराज पुतळा परिसर दणाणूनगेला होता. .

पोलिसांचा फौजफाटा तैनात ..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय व केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार पोलिस आयुक्तांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही हा मोर्चा निघणार असल्याने आंदोलकांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांच्यावर आंदोलन मार्गावरील नियोजनाची धुरा सोपवण्यात आली होती. मराठा आक्रोश मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा विसर्जित करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

मोर्चा संपल्यानंतर संयोजक माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धैर्यशील मोहिते-पाटील, श्रीकांत देशमुख, शिवानंद पाटील ,किरण पवार,राम जाधव आदींनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन सोपवले.

अधिवेशनावर धडक मारणार …

गेल्या आठ दिवसांपासून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाची तौरी केली. मात्र महाविकासह आघाडी सरकारने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा आपण मोर्चा काढलाच. राज्यात अनेक आंदोलने व मोर्चे निघाले त्याला मात्र सरकारने परवानगी आणि आता मराठा आक्रोश मोर्चाला मात्र सरकारने परवानगी नाकारून मराठा समाजाचा अपमान केला आहे. ब्रिटिशांनी कधी आंदोलने दडपली नाहीत परंतु महाविकासह आघाडी सरकारने मात्र सोलापुरातील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आम्ही हणून पाडण्यात यशस्वी झाल्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षासुद्धा वाईट वागणूक मराठा समाजाला देत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे आंदोलन संपलेले नाही असे सांगत आता मराठा आक्रोश मोर्चा अधिवेशनावर धडकणार असल्याचा इशारासुद्धा नरेंद्र पाटील यांनी दिला. आरक्षणप्रशी महाविकास आघाडी सरकारने चालढकल केली आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकार फेल गेल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *