MH13 News Network
सोलापूर – देवाला कोणी पाहिले नाही परंतु या जगात आई वडील आणि गुरू हे आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे त्रिदेव आहेत असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बोलताना व्यक्त केले.
सोरेगाव येथील सुयश गुरुकुल येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, कार्यक्रम अधिकारी बालकल्याण जावेद शेख, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, विद्या शिंदे प्रमुख उपस्थित होते.
देवाला कोणी पाहिले नाही परंतु या जगात आई वडील आणि गुरू हे आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे त्रिदेव आहेत. हे तीनच व्यक्ती आपल्यावर निरपेक्षपणे प्रेम करतात. आपल्या भल्यासाठी आयुष्यभर झटत असतात त्यांचा आदर करा. विद्यार्थी दशेपासूनच आपल्या शरीराला व्यायामाची आणि पौष्टिक आहाराची सवय लावून घ्या. आरोग्य चांगले असेल तर तुम्ही ठरवलेल्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. आजारी व्यक्ती उत्तम यश संपादन करू शकत नाही. आरोग्याप्रमाणेच वेळेची नेहमीच कदर करा. जो वेळेची कदर करतो त्याची वेळही कदर करते. तेंव्हा व्यायाम आणि अभ्यास याव्यतिरिक्त कोठेही वेळ वाया घालवू नका. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर वेळ पाळणे आवश्यक आहे.
सुयश गुरुकुलचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सीईओ स्वामी यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.