Big9news Network
तब्बल दीड वर्षाच्या कालावधीनंतर कालपासून जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी शाळांना भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
काल सकाळपासूनच त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी, धोत्री व दिंडूर या गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी, कन्नड, उर्दू माध्यमांच्या शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्यांनाही आनंद झाला. शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत प्रत्येक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होते. काही शाळांमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली होती. त्या फेरीमध्येही ते सहभागी झाले. धोत्री येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बॅग आणि पाणी पिण्यासाठी बाटली वाटप करण्यात आले.
शाळांमध्ये राबविण्यात आलेले उपक्रम, शाळा बंद असताना करून घेतलेली रंगरंगोटी, स्वच्छता आणि सुशोभीकरण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.