Big9News Network
प्रभाग क्रमांक पाच सध्याला शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विविध ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन आणि सुरुवात होत आहे. त्याच सोबत राजकीय फटकेबाजी, कुरघोड्या दिसून येत आहे. परंतु बाळे भागातील काही भाग हा दुर्लक्षित राहिला आहे.
दरम्यान, याच ठिकाणी असलेल्या राजेश्वरी नगर येथील रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी साधी वाट ही शिल्लक राहिली नाही. पावसात रस्ता वाहून गेला आहे. आम्ही कसे जायचे? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.मागील काही वर्षांपासून दर पावसाळ्यात हा रस्ता खचतो,तात्पुरती डागडुजी होते पुन्हा जैसें थे !
काही दिवसापूर्वी MH13 न्यूज ने याबाबतीत आवाज उठवला होता. तेव्हा झोन विभागाकडून सांगण्यात आले होते की लवकरच येथील रस्ता करण्यात येईल ,परंतु तात्पुरती मलमपट्टी करून महापालिका प्रशासन शांत राहिले.
मागील चार- पाच दिवसात सलग झालेल्या पावसाने येथील रस्ता पाण्याखाली गेला असून लहान मुले, महिलावर्ग, वृद्ध व्यक्ती यांना जाण्यासाठी वाट शिल्लक राहिली नाही. वाहनधारकांना येथून जाण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते.पायी चालत जाणाऱ्यांची तर अवस्था अतिशय वाईट आहे.
या भागातील नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही येथील कामास सुरुवात झाली नाही.
एका बाजूला सर्वत्र विकास कामे होत आहेत मग याच ठिकाणी कामे का होत नाहीत हा सवाल उपस्थित होत आहे.
अजूनही या ठिकाणी प्लास्टिकची pvc पिण्याची पाईपलाईन आहे.त्याचे काम लवकरच सुरू होईल असे जरी सांगण्यात येत असले तरी नेमका मुहूर्त कधी लागणार याची चर्चा होत आहे.
झोन अधिकाऱ्याला तात्काळ सूचना देणार ..
राजेश्वरी नगर येथील समस्यांबाबत महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या आणि अडचणीला तोंड द्यावे लागणार नाही. तात्काळ झोन अधिकाऱ्याला याबाबत सूचना दिल्या जातील.