T20 | सट्टा घेताना शहरात चार ठिकाणी अचानक धाड

Big9news Network

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यावर सट्टा घेणाऱ्या चार ठिकाणी गुन्हे शाखा आणि भरारी पथकाने अचानक धाड़ी टाकून लाखोंचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री ८.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान झाली.

रविवारी रात्री टी-२० विश्वचषक स्पर्धेची फायनल मॅच सुरू होती. मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये अटीतटीचा सामना होत असताना त्यावर शहरात सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री ८.३० वाजता घोंगडे वस्ती येथील एका घरावर धाड टाकली तेव्हा तेथे त्यांना दोघे सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सचिन अंबादास कमलापुरे (वय ३१), मुकुंद अंबादास कमलापुरे (वय २६, दोघे रा. साखरपेठ सध्या घोंगडे वस्ती) या दोन सख्या भावांना अटक केली.

सट्टा कोणाच्या सांगण्यावरून घेत होता, याची चौकशी केली. दोघांनी सांगितलेल्या पत्त्यावर जुने विडी घरकूल येथे पोलिसांनी तत्काळ धाड टाकली. तेव्हा तेथे दत्तात्रय पिट्टाप्पा बडगंची (वय ३५, रा. जी ग्रुप वैष्णवी नगर, मारुती मंदिरजवळ जुने विडी घरकूल, सोलापूर), चनप्पा सिद्धप्पा पुराणिक (वय ३१, रा. न्यू पाच्छापेठ, विजय नगर, सध्या बोळकोटे नगर सोलापूर), श्रीनिवास मुरली चिंता (वय २६ रा. पिट्टा नगर, जुने विडी घरकूल, सोलापूर), सतीश श्रीनिवास मंगलपल्ली (वय २७, रा. राघवेंद्र नगर, जुने विडी घरकूल, सोलापूर) या चौघांना सट्टा घेताना पकडले. दोन्ही ठिकाणांहून सट्टा घेण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल, टी.व्ही, मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण चार लाख नऊ हजार ८०० रुपये असा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, अजय देवराम पाडवी, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, कुमार शेळके, गणेश शिंदे, राजकुमार पवार, अजय गुंड, महिला पोलीस नाईक निलोफर तांबोळी, चालक संजय काकडे यांनी पार पाडली आहे.

सहा जणांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी –

  • गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा जणांना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना न्यायाधीशांनी दि. १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
  • शेवटच्या फायनल मॅचमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ऑस्ट्रेलिया जिंकणार की न्यूझीलंड यावर सट्टा लावला जात होता. फोनवरून लाखो रुपयांची उलाढाल होत होती.