- या वर्षी शुक्रवार, 23 जुलै 2021 या दिवशी गुरुपौर्णिमा असून त्या निमित्ताने गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ? महत्त्व सांगणारा हा लेख
लेखांक : 1
*गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?*
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते. तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून ‘मी काय केले की ती खुष होईल’, या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला ‘माझे’ म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून ‘मी काय केले की ते प्रसन्न होतील’, या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते. कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ति आणि गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.
*सर्वोत्तम सत्सेवा : अध्यात्मप्रसार*
गुरुकार्यासाठी आपल्या परीने करता येईल ते सर्व करणे, हा सर्वांत सोपा आणि महत्त्वाचा मार्ग होय. हे सूत्र पुढील उदाहरणावरून लक्षात येईल : समजा एका कार्यक्रमाच्या सिद्धतेसाठी कोणी साफसफाई करत आहे, कोणी जेवण बनवत आहे, कोणी भांडी धूत आहे, तर कोणी सजावट करत आहे. आपण साफसफाईच्या कामात आहोत. अशा वेळी आणखी एक जण आला आणि तो जेवण बनवणार्यांच्या सोबत काम करायला लागला, तर आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही. मात्र तोच जर आपल्याला साफसफाईच्या कामात साहाय्य करू लागला, तर तो आपला वाटतो. तसेच गुरूंचे असते. गुरूंचे आणि संतांचे एकमेव कार्य म्हणजे समाजात धर्माविषयी आणि साधनेविषयी गोडी निर्माण करून सर्वांना साधना करायला प्रवृत्त करणे आणि अध्यात्माचा प्रसार करणे. आपण तेच काम जर आपल्या कुवतीप्रमाणे करू लागलो, तर गुरूंना वाटते की, ‘हा माझा आहे’. त्यांना असे वाटणे म्हणजेच गुरुकृपेची सुरुवात होय.
एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले आणि सांगितले, ‘‘मी परत येईपर्यंत हे गहू नीट सांभाळा.’’ एका वर्षाने परत आल्यावर गुरु पहिल्या शिष्याकडे गेले आणि विचारले, ‘‘गहू नीट ठेवले आहेस ना ?’’ त्यावर त्या शिष्याने ‘हो’ म्हणून गहू ठेवलेला डबा आणून दाखवला आणि म्हणाला, ‘‘आपण दिलेले गहू जसेच्या तसे आहेत.’’ त्यानंतर गुरु दुसर्या शिष्याकडे गेले आणि त्याला गव्हाविषयी विचारले. तेव्हा तो शिष्य गुरूंना जवळच्या शेतावर घेऊन गेला. गुरु पहातात तर सगळीकडे गव्हाच्या कणसांनी डवरलेले पीक दिसत होते. ते पाहून गुरूंना खूप आनंद झाला. असेच आपल्या गुरूंनी दिलेले नाम, ज्ञान आपण इतरांना देऊन वाढवले पाहिजे.
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गुरुकृपायोग’
संकलक : हिरालाल तिवारी
सनातन संस्था
Leave a Reply