Big9news Network
शाळांमध्ये दररोजच राष्ट्रगीत गायले जाते. ग्रामपंचायत कार्यालयात फक्त राष्ट्रीय सणादिवशी म्हणजे वर्षातून फक्त तीन वेळाच राष्ट्रगीत गायन होते. आज नववर्षाच्या पहिला दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे 75,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास सामुहिक राष्ट्रगीत गायले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात हा पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गांवभर व जिल्हाभर देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सीईओ स्वामी यांनी केल्याने त्यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये हजर होते.
यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोसे(क) तालुका पंढरपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले आहे. आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी अनेकांनी प्रचंड त्याग केला आहे याची जाणीव विद्यार्थ्यांसह प्रत्येक नागरिकाला व्हावी आणि सर्वत्र देशभक्तीपर वातावरण निर्माण व्हावे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी सीईओ स्वामी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्जनासाठी सुखाचा त्याग केला तर त्यांना विद्या प्राप्त होईल. विद्यार्थी दशेत नुसते सुख भोगत असाल तर तुम्हाला विद्या प्राप्त होणार नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आज आराम व सुखाचा त्याग केला तरच यश पदरी पडेल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अक्षरांची मानवी रांगोळी साकारण्यात आली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, झाशीची राणी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक महापुरुषांच्या वेशभूषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते. स्फुर्तिगीते, देशभक्ती गीतांनी संपुर्ण गावात देशभक्तीपर वातावरण तयार झाले होते. ढोल ताशा अन् लेझीम खेळत खेळांचा साथ संगत करत विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण झाला होता. विविध रंगीबेरंगी फुगे…मैदानावर भारताचा नकाशा रेखाटणेत आला होता. कोरोना नियंमांचे पालन करत आझादीला ७५ वर्षे पुर्ण झाले बद्दल महोत्सव साजरा करणेत आला. रंगेबेरंबी झेडपी फुलांनी संसद ग्राम, शाळा, अंगणवाडी व माध्यमिक शाळेचा परिसर सजविणेत आला होता.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, पंचायत समिती पंढरपूर गटविकास अधिकारी प्रशांत काळे, ग्रामपंचायत भोसे सरपंच गणेशदादा पाटील, प्राचार्य दादासाहेब गाडे, उपसरपंच भारत जमदाडे, जयवंतराव गावंधरे, नागनाथ काळे व ग्रामसेवक भुजबळ उपस्थित होते.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हगलूर ता. उत्तर सोलापूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता स्मिता पाटील व उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक सुमंत पौळ व शहाजी शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कोविड काळात उत्तम सेवा बजावलेल्या आशा स्वयंसेवीका वंदना मोरे व पुनम पौळ यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक राजकुमार साबळे यांनी केले.