Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

तीन राष्ट्रीय पुरस्कार, अकरा फिल्म फेअर ॲवार्ड्स, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार. आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूड गाजवणारा हिंदी चित्रपटसृष्टीचा अनभिषिक्त सम्राट बॉलीवूडचा  ‘शो मॅन ‘ राज कपूरचा आज जन्मदिवस

दि.14 डिसेंबर 1924 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव रणबीर कपूर. बॉलिवुडच्या सर्वात प्रसिद्ध घराण्यात जन्मलेल्या राज कपूर यांनी जे कमावलं ते केवळ स्वतःची मेहनत आणि अंगातल्या कलागुणाच्या जोरावर. राज कपूर यांच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून पंजाब येथे येऊन वसले. त्यांचे शिक्षण देहरादून येथे झाले. पण अभ्यासात त्यांचे मन कधी नव्हतेच. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळा सोडली. पुढे राज कपूर, पिता पृथ्वीराज कपूर यांच्यासह मायानगरी मुंबईला येऊन रहायला लागले आणि येथून सुरू झाली त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सफर. ” राजू छोट्या कामापासून सुरूवात करशील, तरच मोठा होशील !” हा कारकीर्दीच्या सुरूवातीला वडिलांनी दिलेला कानमंत्र ते कधीच विसरले नाहीत .

वयाच्या चोवीसाव्या वर्षी इ.स.1948 साली त्यांनी आर के स्टुडिओ ची स्थापना केली . सर्वात लहान वयाचा दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात. खरं तर त्यांना संगीत दिग्दर्शक बनायचं होतं . पण ते निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते असे सगळेच बनले. ‘बरसात‘ हा आर के स्टुडिओचा पहिला हिट सिनेमा . या चित्रपटात राज सोबत नर्गीस प्रमुख भूमिकेत होती . यातील एक सीन लोकांना इतका आवडला की , पुढे तोच आर के स्टुडिओचा लोगो बनला . एका हातात सौंदर्य , एका हातात संगीत हे चित्र राज कपूर यांना खूप आवडले . राज या दोन्हीचे भोक्ते होते . राज नर्गिस या जोडीला लाभलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती . तशी लोकप्रियता क्वचितच कुणाच्या वाट्याला आली असेल . ऑन स्क्रीन , ऑफ स्क्रीन राज नर्गिस जोडी मशहूर होती .

राज कपूर आपल्या पहिल्या सिनेमासाठी एका स्टुडिओच्या शोधात होते . नर्गिसची आई जद्दनबाई फेमस स्टुडिओमध्ये रोमिओ ज्युलिएटचे शूटिंग करत होती . फेमस स्टुडिओमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत या चौकशीसाठी ते जद्दनबाईंच्या घरी पोहोचले . जेंव्हा ते तिथे पोहोचले , तेंव्हा नर्गिसने दरवाजा उघडला होता . किचनमधून धावत येऊन तिने दरवाजा उघडला तेंव्हा ती पकोडे तळत होती . केस सावरताना हाताला लागलेले बेसनाचे पीठ तिच्या केसांवर पसरले . नर्गिसच्या या अवतारावर राज कपूर लट्टू झाला होता . हा प्रसंग जसाचा तसा नंतर ऋषी कपूर व डिंपल कापडिया यांच्यावर बॉबी चित्रपटात चित्रित केला गेला . पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले होते.

राज यांच्या चित्रपटातील नायक सामान्य माणूस आहे . फूटपाथवर राहणारे , फेरीवाले , चहा विकणारे राज कपूरच्या चित्रपटात सर्रास आढळतात .गरीबीचे उदात्तीकरण स्वतः ऐषोआरामात राहून आलेले नव्हते . राज स्वतः अत्यंत साधा होता .

राज चोरीचोरीचे शुटिंग मद्रासमध्ये करत होते . सत्यजित राय दिग्दर्शित पथेर पांचाली हा चित्रपट त्यावेळी मद्रासमध्ये दाखवला जात होता . राज यांनी तो चित्रपट पाहिला आणि दोन दिवस ते त्या प्रभावातून बाहेर येऊ शकले नाहीत . आर के बॕनरखाली चित्रपट बनवण्यासाठी ते सत्यजित राय यांना भेटलेसुद्धा पण राय यांना हिंदी येत नव्हती त्यामुळे हे शक्य झाले नाही .

राज सुरूवातीला अभिनयापेक्षा चित्रपटाच्या इतर अंगात रुची दाखवत होता . म्हणून पृथ्वीराजनी राजला मार्गदर्शनासाठी केदार शर्मा यांच्याकडे पाठवले . पृथ्वीराज , राजसाठी स्वतः चित्रपट निर्माण करू शकत होते . पण मुलाने या व्यवसायाची सुरूवात एबीसीडी पासून करावी अशी त्यांची इच्छा होती . केदार शर्मा यांच्या चित्रपटात राजला क्लॕपर बॉयचे काम मिळाले . शॉट सुरू होण्यापूर्वी राज केसात कंगवा फिरवून क्लॕप देत असे .केदार यांनी त्याला अनेकदा समजावले की , तू चित्रपटात दिसणार नाहीयेस त्यामुळे केस विंचरण्याची गरज नाही . पण , राज त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असे . एकदा त्यांनी क्लॕपर पट्टी एवढ्या जोरात आदळली की , जवळ उभ्या असलेल्या एका अभिनेत्याची नकली दाढी त्यात अडकून खाली पडली . हे पाहून केदार शर्मा भडकले . त्यांनी एक सणसणीत थप्पड राजच्या गालावर ठेवून दिली , त्यादिवशी राजच्या डोळ्यांत जे दुःख दिसले त्यामुळे केदार शर्मा आतून हलले . या थप्पडीने राजच्या चित्रकारकीर्दीचा प्रवास सुरू झाला .केदार शर्मांनी राजला नीलकमल या चित्रपटात नायकाची भूमिका दिली . राज कपूर यांचे जगभरात चाहते होते . मध्य पूर्व आशिया , रशिया , आफ्रिका , चीन दक्षिण पूर्व आशिया या देशांमध्ये त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती . ‘ मेरा जूता है जपानी ‘ हे गीत जगभरात प्रसिद्ध झाले . राज चार्ली चॕप्लीनचे प्रशंसक होते . त्यांच्या अभिनयावर चार्ली चॕप्लीन यांचा पूर्ण प्रभाव होता .

राज कपूरला संगीताची चांगलीच जाण होती . लोकांना कुठल्या प्रकारचं संगीत आवडतं याची त्याला चांगलीच समज होती . आजही त्याच्या चित्रपटातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत . लोकप्रिय संगीतकार शंकर जयकिसन हे सतत अठरा वर्षांपेक्षा जास्त काळ नं 1 चे संगीतकार होते . त्यांना पहिली संधी राजनी बरसात या आपल्या चित्रपटातून दिली होती . आपल्या चित्रपटातील संगीतासाठी त्यांची एक टीमच होती . गीतकार शैलेंद्र व हसरत जयपुरी , गायक मुकेश , संगीतकार शंकर जयकिशन हे त्या टीमचे बिनीचे शिलेदार होते . एकमेकांचे गाढ मित्र होते . जवळजवळ दोन दशकांचा दीर्घकाळ एकत्र काम करत होते . मुकेश यांच्या मृत्यूनंतर ” आज माझा आवाज हरपला ” ही राजची प्रतिक्रिया होती . राज , दिलीप , देव यांची घनिष्ट मैत्री होती . आर के स्टुडिओतील राजची मेकअप रूम वापरण्याची परवानगी फक्त देव आनंदला होती . विजय आनंद यांनी या तिघांना एकत्र घेऊन एक चित्रपट बनवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता . पण , या तिघांच्या तारखांचा घोळ आणि तिघांचाही अहंकार यामुळे तो प्रयत्न बारगळला .

इ.स.1971 साली भारत सरकारने राज कपूरला पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते.

राज कपूर यांची तब्येत ठीक नसतानाच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण मिळाले , ते तयारही झाले . दिल्लीच्या सिरीफोर्ट ऑडिटोरियममध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार होता . राज कपूर यांना तीव्र दम्याचा त्रास होता . त्यासाठी त्यांना ऑक्सिजन पुरवठा गरजेचा होता . सुरक्षा कारणास्तव राज कपूर यांना आॉक्सिजन सिलिंडर सोबत नेण्याची परवानगी नाकारण्यात आली . पुरस्कारासाठी त्यांचे नाव पुकारले गेले , तेंव्हाच त्यांच्या छातीत तीव्र कळ आली . हे पाहून तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण प्रोटोकॉल तोडून स्टेजवरून खाली उतरत राज कपूर यांच्या जवळ आले होते . राज कपूर यांना ताबडतोब एम्स रुग्णालयात हलवण्यात आले . एक महिना रुग्णालयात राहिल्यावर त्यांनी तेथेच अंतीम श्वास घेतला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ह्या ग्रेट शो मन ला सलाम !

मुकुंद कुलकर्णी©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *