सोलापूर,दि.22: वाचाल तर वाचाल, या वाक्याला कधीकाळी खूप महत्व होते. कथा, कादंबरी, कविता, वर्तमानपत्रे आजही नियमितपणे वाचली जात आहेत. मात्र 21 व्या शतकात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी डिजीटल साक्षरतेची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रंथमित्र, प्राaचार्य हरिदास रणदिवे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय वाचन दिवस ऑनलाईनद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय डिजीटल साक्षरता आणि सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका या विषयावर प्राचार्य रणदिवे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील होते.
श्री. रणदिवे म्हणाले, वाचन चळवळ टिकविण्यासाठी,नवीन पिढीला वाचनप्रेमी बनविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी डिजीटल साक्षर व्हायला हवे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी सुद्धा बदल स्विकारावेत. स्वत: डिजीटल स्वाक्षर होऊन इतरांना साक्षर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यापुढे सार्वजनिक ग्रंथालयांनी विविध कार्यक्रमांपैकी डिजीटल साक्षरता कार्यक्रम घेऊन सामान्यांना साक्षर बनवूया. शासनस्तरावरही ई-गव्हर्नन्स राबविले जात आहे. सर्व काम पेपरलेस करण्याचे सुरू असून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले, हा एक डिजीटल साक्षरतेचाच भाग आहे.
जगण्यासाठी, कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी डिजीटल साक्षरतेची नितांत आवश्यकता आहे. यासाठी संगणक किंवा लॅपटॉप, ॲन्ड्रॉईड मोबाईल आणि इंटरनेट याची आवश्यकता आहे. सध्या अधिकाऱ्यांची सही डिजीटल सिग्नेचर म्हणून येऊ लागली आहे. तंत्रस्नेही होण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ग्रंथालयांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी, सीएसई सेंटर उभी झाली तर ग्रंथालय स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. रणदिवे यांनी सांगितले.
ग्रंथपाल स्मार्ट झाला तर ग्रंथालय स्मार्ट होतील. ग्रंथालय डिजीटल झाले तर देश डिजीटल होईल, यासाठी ग्रंथालयांनी अनुदानाव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करायला हवेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले की, 19 जून हा केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक पी.एन. पानिकर यांचा स्मृतीदिन राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा केला जातो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी पारंपरिक सेवेसोबतच बदलते तंत्रज्ञान स्वीकारून सेवा देणे गरजेचे बनले आहे.
झूम ॲपद्वारे ऑनलाईन व्याख्यानात जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचे ग्रंथपाल, त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप गाडे यांनी आभार मानले.